अमली पदार्थांच्या नकाशावर नवी मुंबई
पोलिसांकडून आंतरराष्ट्रीय टोळ्यांचा बीमोड
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ४ : विकासासोबतच शहराला अमली पदार्थ तस्करीच्या जाळ्याने ग्रासले असल्याचे वास्तव २०२४ ते २०२६ अशा गेल्या तीन वर्षांतील आकडेवारीवरून समोर आले आहे. नवी मुंबई पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या ‘अमली पदार्थमुक्त नवी मुंबई’ या विशेष मोहिमेमुळे या गुन्हेगारांचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय स्तरावर पसरल्याचे उघड झाले आहे. नवी मुंबईतील अमली पदार्थांच्या गुन्हेगारीचे वाढते प्रमाण, त्यात परदेशी नागरिकांचा असलेला सहभाग, पोलिसांच्या धोरणात्मक कारवाया आणि गुन्हेगारी साखळी मोडीत काढण्यासाठी वापरात आलेल्या कायदेशीर पावलांमुळे अमली पदार्थ पुरवणाऱ्या टोळ्यांचे धाबे दणाणले आहेत.
२०२४ मध्ये अमली पदार्थांबाबतच्या ६५४ गुन्ह्यांची नोंद झाली होती. २०२३ मधील ४७५ गुन्ह्यांच्या तुलनेत ही मोठी वाढ आहे. २०२५मध्ये ही परिस्थिती अधिक गंभीर झाली. केवळ अमली पदार्थ सेवनाचे ९०२ गुन्हे नोंदवण्यात आले. २०२५ मध्ये गुन्ह्यांची संख्या आणि जप्तीचे मूल्य २०२४च्या तुलनेत जवळपास दुप्पट झाले आहे. विशेष म्हणजे २०२५मध्ये अमली पदार्थांच्या एकूण जप्तीचे मूल्य ६७.४८ कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे.
नवी मुंबईतील अमली पदार्थांच्या गुन्हेगारीत परदेशी नागरिकांचा, विशेषतः आफ्रिकन देशांतील नागरिकांचा मोठा सहभाग ही चिंतेची बाब आहे. पोलिसांनी केलेल्या अनेक मोठ्या कारवायांमध्ये परदेशी नागरिकांना कोकेन, मेफेड्रोन आणि ट्रामाडोल यांसारख्या उच्च किमतीच्या अमली पदार्थांसह अटक केली आहे.
अमली पदार्थ विरोधी कारवाईबाबतची आकडेवारी (२०२३-२०२६)
कालखंड नोंदवलेले गुन्हे अटक केलेले आरोपी जप्त केलेल्या अमली पदार्थांचे मूल्य (कोटींमध्ये)
२०२३ (पूर्ण वर्ष) २९० ३५३ २१.१३
२०२४ (पूर्ण वर्ष) ४८४ ६०९ ३०.१४
२०२५ (पूर्ण वर्ष) ९९० १,१५६ ६७.४८
२०२६ (मार्चपर्यंत) २२९ २७८ १७.२७
एकूण (४० महिने) १,९९३ २,३९६ १३६.०२
ऑपरेशन गरुड आणि आफ्रिकन किचन मोहिमेची व्याप्ती :
उलवे येथील धाडसत्र : ऑक्टोबर २०२३मध्ये पोलिसांनी उलवे नोडमधील सेक्टर ३, ५, १८, २४ आणि २५ मध्ये एकाच वेळी धाडी टाकल्या. या कारवाईत १६ परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली. यामध्ये ज्युलियस ओ. अँथनी याच्याकडून ७० लाख रुपयांचे एमडी आणि १४.२५ लाखांचे कोकेन जप्त करण्यात आले.
आफ्रिकन किचन कारवाई : खारघर आणि वाशी परिसरात आफ्रिकन किचन या नावाखाली चालणाऱ्या तीन बेकायदा आस्थापनांवर पोलिसांनी कारवाई केली. हे ठिकाण केवळ अन्नासाठी नसून अमली पदार्थांच्या पार्ट्या आणि बेकायदा दारू विक्रीचे असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
नायजेरियन टोळ्यांचा पर्दाफाश : डिसेंबर २०२४मध्ये एका मोठ्या कारवाईत १३ नायजेरियन नागरिकांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून १२ कोटी रुपयांहून अधिक मूल्याचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. यात कोकेन आणि एमडी पावडरचा समावेश होता.
आंतरराष्ट्रीय सिंडिकेट सालीम डोला आणि कोकेन रॅकेट
नवी मुंबईतील अमली पदार्थांच्या गुन्हेगारीचे धागेदोरे तुर्की, संयुक्त अरब अमिराती आणि दक्षिण-पूर्व आशियातील देशांपर्यंत पोहोचले आहेत. यामध्ये मोहम्मद सालीम डोला या आंतरराष्ट्रीय ड्रग्जमाफियाचे नाव अग्रक्रमाने समोर आले आहे.
शांताबाई कारंडेकर टोळी आणि दिघा येथील कारवाई
१) दिघा आणि रबाळे एमआयडीसी परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या शांताबाई कारंडेकर टोळीवर जुलै २०२५ मध्ये मकोकाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या टोळीने अमली पदार्थांच्या विक्रीतून अफाट संपत्ती जमवली होती आणि परिसरात हत्या व खुनी हल्ल्यांसारखे गुन्हे करून आपली पकड घट्ट केली होती.
२) २९ एप्रिलला नवी मुंबई पोलिस आणि सिडकोने दिघा येथील या टोळीच्या मालकीच्या अवैध दोन मजली इमारतीवर बुलडोझर फिरवला. अमली पदार्थांच्या व्यापारातून कमावलेल्या पैशातून उभी केलेली मालमत्ता कोणत्याही परिस्थितीत टिकू दिली जाणार नाही, असा कडक संदेश या कारवाईतून पोलिस आयुक्तांनी दिला आहे.
पंजाब कनेक्शन आणि हेरॉइन तस्करी
नवी मुंबईत गेल्या दोन वर्षांत पंजाबमधून येणाऱ्या अमली पदार्थांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. पंजाबमधील टोळ्या ट्रक आणि रेल्वेच्या माध्यमातून हेरॉइन आणि अफीम शहरात आणून येथील लॉज आणि हॉटेल्समधून त्याचा व्यापार करीत असल्याचे उघड झाले आहे.
२५ तस्करांना अटक : जानेवारी २०२६मध्ये अमली पदार्थविरोधी पथकाने पंजाबमधील २५ तस्करांना अटक केली. त्यांच्याकडून ३.३ कोटी रुपयांचे हेरॉइन आणि अफीम जप्त करण्यात आले.
साहिब सिंग ऊर्फ सबा : या टोळीचा मुख्य सूत्रधार साहिब सिंग जोगिंदर सिंग ऊर्फ सबा याला अमृतसरमधून अटक करण्यात आली. हे रॅकेट नवी मुंबईतील स्थानिक वितरकांना अमली पदार्थांचा पुरवठा करीत होते.
लॉज आणि वसतिगृहांचा वापर : तपासात असे आढळले की हे तस्कर खारघर, तळोजा आणि कोपरखैरणे येथील स्वस्त लॉज आणि विद्यार्थी वसतिगृहात भाड्याने राहून आपले नेटवर्क चालवत होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.