वाढत्या उकाड्याचा संत्र्यांना मोठा फटका
नवी मुंबईतील फळ बाजारात मालाची नासाडी
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ४ : राज्यात उन्हाचा कडाका वाढत असतानाच त्याचा थेट परिणाम आता शेतमालावर, विशेषतः फळांवर होऊ लागला आहे. आशियातील सर्वांत मोठी बाजारपेठ असलेल्या नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजारपेठेत वाढत्या उष्णतेमुळे संत्र्यांचे मोठे नुकसान झाले आहे. उकाड्यामुळे खराब झालेली संत्री आज व्यापाऱ्यांना कचऱ्यात फेकून द्यावी लागली असून, यामुळे लाखो रुपयांचा फटका बसला आहे.
सध्या नवी मुंबईच्या फळ बाजारात प्रामुख्याने महाराष्ट्रातील नागपूर आणि अमरावती या भागांतून संत्र्यांची मोठी आवक होत आहे. मात्र, विदर्भात तापमानाचा पारा ४४ ते ४५ अंशाच्या पुढे गेल्याने झाडावर असतानाच फळांना उष्णतेचा फटका बसला आहे. उन्हाळ्यामुळे रसाळ फळांना मागणी जास्त आहे. मात्र, संत्री खराब होत असल्याने पुरवठा कमी होत आहे. परिणामी, येणाऱ्या काही दिवसांत संत्र्यांचे भाव अजून वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ग्राहकांनी संत्री खरेदी करताना ती नीट तपासून घेण्याचे आवाहनही व्यापाऱ्यांनी केले आहे. विदर्भातील तीव्र उष्णतेमुळे संत्री टिकण्याची क्षमता कमी झाली आहे. चांगल्या दर्जाचा माल कमी येत असल्याने किमती वाढत आहेत. पण, खराब मालामुळे व्यापाऱ्यांचे नुकसानही होत आहे. सध्या घाऊक बाजारात दर्जाप्रमाणे संत्र्यांचे भाव प्रतिकिलो ४० ते ६० रुपयांच्या दरम्यान आहेत, तर किरकोळ बाजारात ग्राहकांना हीच संत्री प्रतिकिलो ७० ते १०० रुपयांपर्यंत विकत घ्यावी लागत आहेत.
साठवणूक करणे झाले कठीण
संत्र्यांचा मृग बहार आता संपत आला असून, उरलेला माल उष्णतेमुळे टिकणे कठीण झाले आहे. व्यापाऱ्यांच्या मते :
ट्रकमधील उष्णता : नागपूर-अमरावतीहून नवी मुंबईपर्यंतच्या प्रवासात ट्रकमधील तापमानामुळे फळे आतून गरम होऊन सडू लागली आहेत.
साठवणुकीची मर्यादा : संत्र्यांसारख्या नाशवंत फळांना जास्त काळ साठवून ठेवणे शक्य होत नाही आणि उष्ण हवामानामुळे त्यांचा पोत बिघडत आहे.
फेकून देण्याची वेळ : आज बाजारात आलेल्या एकूण मालापैकी १० ते १५ टक्के माल खराब झाल्यामुळे तो फेकून द्यावा लागला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.