आरटीई प्रवेशात पत्त्याची अडचण
रजिस्टर रेंट ॲग्रीमेंटच्या अटीची अडसर
पनवेल, ता. ४ (बातमीदार) : मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्कासाठी राबविण्यात येणाऱ्या आरटीई प्रवेश प्रक्रियेत यंदा पत्त्याचा पुरावा मोठा अडसर ठरत असल्याचे चित्र पनवेल येथे समोर आले आहे. रजिस्टर रेंट ॲग्रीमेंटची अट असल्याने आणि स्टॅम्प पेपरवरील भाडे करार ग्राह्य न धरल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द झाले आहेत. परंतु प्रवेशाला मुदतवाढ दिल्याने पनवेलमधील सर्व जागा भरणार असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी शाहू सतपाल यांनी दिली.
शहरातील स्थलांतरित व भाड्याने राहणाऱ्या कुटुंबांवर या नियमाचा सर्वाधिक परिणाम झाला आहे. अनेक पालकांकडे फक्त स्टॅम्प पेपरवरील भाडे करार उपलब्ध असून, नोंदणीकृत (रजिस्टर) करार नसल्याने त्यांच्या मुलांचे अर्ज बाद करण्यात आले. त्यामुळे पात्र असूनही प्रवेश न मिळाल्याने पालकांमध्ये तीव्र नाराजी आणि निराशा पसरली आहे. पालकांच्या मते, शिक्षणाचा अधिकार हा सर्वांसाठी समान असताना केवळ कागदपत्रांच्या तांत्रिक अटींमुळे मुलांना प्रवेश नाकारणे अन्यायकारक आहे. काही पालकांनी प्रशासनाकडे नियमांमध्ये सवलत देण्याची मागणीही केली आहे. या प्रकरणामुळे आरटीईच्या उद्दिष्टांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, गरजू विद्यार्थ्यांना न्याय मिळण्यासाठी प्रशासनाने व्यावहारिक तोडगा काढण्याची गरज व्यक्त होत आहे.
सर्व जागा भरणार
शिक्षण विभागाने मात्र नियमांचे पालन आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे. गटशिक्षणाधिकारी साहू सतपाल यांनी सांगितले, की प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची अट घालण्यात आली आहे. काही प्रवेश रद्द झाले असले तरी पनवेलमधील सर्व आरटीई जागा लवकरच भरल्या जातील. कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी प्रत्येक स्तरावर दक्षता घेतली गेली. पडताळणी पूर्ण होताच पात्र विद्यार्थ्यांना तत्काळ मंजुरी देऊन संबंधित शाळांना अधिकृत संदेश पाठवण्यात येत होता. त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया अधिक गतिमान झाली. येत्या काळात आणखी विद्यार्थ्यांना शिक्षणाचा हक्क मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.