

The Political Satire: A Mirror to Maharashtra’s Current Crisis
Sakal
सदू : (खवचटपणाने फोन फिरवत) कूऽक…फुर्रर्र…फ्रीऽऽक..!
दादू : (कपाळाला आठ्या) हे काय? सद्या, हा काय चावटपणा आहे? मी ओळखतो तुझा आवाज!
सदू : (डोळे मिचकावत) गंमत केली! इंजिनाचा आवाज काढला!! मला वाटलं, तू फसशील!
दादू : (टोमण्यांना सुरवात…) यार्डात उभी असलेली इंजिनं कधीपासून शिट्या मारायला लागली?
सदू : (गंभीर होत) कळतात मला हे टोमणे!
दादू : (कडवटपणाने) हे बघ, माझा मूड अजिबात चांगला नाही! उगीच शिळोप्याच्या गप्पा मारायला मला वेळ नाही!
सदू : (पुन्हा खवटचटपणा डोकं वर काढत) वेळ नाही? मग आता उरलंय तरी काय आपल्याकडे, दादूराया?
दादू : (गोऱ्यामोऱ्या चेहऱ्यानं) तेही खरंच म्हणा! हल्ली खऱ्याची दुनियाच राहिली नाही! ज्याचं करावं भलं, तो म्हणतो धनुष्यबाणच खरं!!
सदू : (सांत्वन करत) पक्ष फुटला म्हणून वाईट वाटून घेऊ नकोस! मनाशी म्हण, उरलेलेही जातील!!
दादू : (भडकून) सद्या..! तोंड सांभाळून बोल!! गाठ माझ्याशी आहे…
सदू : (मखलाशी करत) उरलेले दिवसही जातील, असं म्हणायचं होतं मला!! उगीच कशाला रागावतोस? शेवटी काहीही झालं तरी मी तुझा भाऊ आहे, आणि आपलं मनोमीलन झालंय, हे विसरु नकोस!!
दादू : (ओशाळून) खरं रे खरं! माझी मनस्थिती ठीक नाही, म्हणून असं बोललो! तू मनावर घेऊ नकोस! नाहीतरी सध्या तुला मी, आणि मला तू…आहेच कोण दुसरं?
सदू : (समाधानाने) आता कसं बोललास? पुढे काय करायचं ठरवलं आहेस?
दादू : (चक्रावलेल्या अवस्थेत) मी कोण ठरवणार? या देशात आपण काहीही ठरवत नाही, इतकं राजकारण हल्ली कळतं मला!!
सदू : (आवाज हळूवार करत) पक्षाचा राजीनामा द्यायची भाषा का केलीस? मी ऐकलं तुझं भाषण! माझ्या डोळ्यात आसवं उभी राहिली…म्हटलं, जिथं फुलं वेचली, तिथं…
दादू : (हुंदका फुटून) नको, नको काढूस तो विषय सदूराया! मनाला सहा इंगळ्या एकाच वेळी डसतात!! माझे सहा शिलेदार त्या दाढीवाल्याच्या…(दात ओठ खात) जाऊ दे!
सदू : (हलकेफुलकेपणाने) दाढीवरुन आठवलं, आपल्या दोघांनाही दाढी नाही…नै?
दादू : (संतापातिरेकानं) दाढी बघितली तरी माझ्या अंगाची आग होते!! एकेक केस उपटून काढून…(दात ओठ खात) जाऊ दे!!
सदू : (जनरल नालेज देत) काही लोकांची दाढी कुरळी असते बरं का? गंमतच एकेक!!
दादू : (गंभीर होत) ही गंमतीची वेळ नाही, सदू! रात्र वैऱ्याची आहे, आणि दिवस दुश्मनाचा!! कधी कधी असं वाटतं की सगळं सोडावं आणि माहीमच्या मासळी बाजारात जाऊन सणसणीत दोन पापलेटं, डझनभर बोंबील आणावेत, आणि-
सदू : (मध्येच थांबवत) इतका दिल टाकू नकोस, दादूराया! माझ्याकडे बघ, मी कधी तुला दु:खात दिसलो का? एकेकाळी माझे नगरसेवक तूच फोडलेस, तरीही मी काही बोललो का? माझा एकही खासदार निवडून आला नाही, हे किती बरं झालं! जो होता हय, अच्छे के लिएही होता है!
दादू : (स्वत:ला सावरत) तुझ्याकडे बघूनच मी दिवस काढतोय, सदूराया!
सदू : (प्रोत्साहन देत) शाब्बास! अशीच उभारी धर! पक्ष आपोआप उभा राहील!
दादू : (सल्ला मागत) नेमकं काय करु?
सदू : (निश्चिंतपणाने) काहीही करायचं नाही! इथं छातीवर हात ठेवायचा, आणि म्हणायचं, ऑल इज वेल! ऑल इज वेल! ऑल इज वेल!!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.