धारावीकरांना बेघर करण्याचे षड्यंत्र
जनआक्रोश मोर्चात खासदार वर्षा गायकवाड यांचा आरोप
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : ‘अदाणीसाठी भाजप सरकार धारावीकरांना बेघर करत असून, स्थानिकांना घरे कुठे मिळणार, हे सांगितले जात नाही. पोलिस, गुंड, दलाल व सरकारी यंत्रणांच्या मदतीने स्थानिकांना धमकावले जात आहे. धारावीत वर्षानुवर्षे राहणाऱ्या धारावीकरांना अपात्र ठरवून बेघर करण्याचे मोठे षड्यंत्र असून, सरकारच्या सर्व यंत्रणा अदाणीसाठी काम करत आहेत,’ असा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी सोमवारी (ता. ४) काढण्यात आलेल्या जनआक्रोश मोर्चादरम्यान केला. तसेच धारावीकरांना विश्वासात घेतल्याशिवाय एक वीटही हलू देणार नाही, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला.
धारावी पुनर्वसन प्रकल्पातून ५०० चौरस फुटांचे घर मिळावे, अपात्रतेचा खेळ करू नये, अशा विविध मागण्यांसाठी आज धारावीत जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड, शिवसेनेचे खासदार अनिल देसाई, आमदार महेश सावंत, अंबादास दानवे, ज्योती गायकवाड, माजी आमदार बाबूराव माने, आदी उपस्थित होते. ‘भाजप सरकारला जनतेचा आक्रोश ऐकू येत नाही, त्यांना फक्त अदाणीचा आवाज ऐकू येतो व अदाणीचाच फायदा दिसतो. धारावीची परिस्थिती अत्यंत भयावह आहे, धारावीकरांना अंधारात ठेवले जात आहे. महापालिका अधिकारी माहिती देत नाहीत, चर्चा करायला तयार नाहीत, धारावीकरांना नक्की घर कुठे मिळणार? दुकान कुठे मिळणार? हे सांगितले जात नाही. पुराव्यांची कागदपत्रे असतानाही लोकांना अपात्र करणे हा अन्याय आहे.’ असा आरोप वर्षा गायकवाड यांनी या वेळी केला.
अस्तित्वासाठी लढा!
हा लढा केवळ घरांसाठी नाही, तर आमच्या अस्तित्वासाठी आहे. धारावीत मोठ्या प्रमाणात लघुउद्योग आहेत, त्यांचे पुनर्वसन धारावीतच झाले पाहिजे. धार्मिक स्थळांचे पुनर्वसन, कोळीवाड्यांचे सिमांकन करण्यात यावे व शाहुनगरसारख्या मोठ्या वसाहतीसंदर्भातही लवकर निर्णय घेऊन त्यांचेही पुनर्वसन धारावीतच झाले पाहिजे, अशी मागणीही वर्षा गायकवाड यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.