राहुल क्षीरसागर : सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ६ : जिल्ह्यातील ग्रामीण परिसर टँकरमुक्त करण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाकडून पावले उचलण्यात येत आहेत. तसेच केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेपैकी जल जीवन मिशन अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या हर घर नल से जल योजनेला निधीअभावी खीळ बसल्याचे दिसून येत आहे. मागील सात वर्षांत जिल्ह्यातील ७९१ पैकी अवघ्या १९७ गावांमध्ये हर घर जल म्हणून घोषित करण्यात आली असून एक लाख ९७ हजार ४९८ कुटुंबाना नळजोडणी दिल्याचा दावा करण्यात येत आहे. तर, दुसरीकडे १३४ कोटींची देणी थकीत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांच्या डोक्यावरील हंडा कधी उतरणार, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
ठाणे जिल्ह्यात २०१९ पासून जल जीवन मिशन राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत २०२४ अखेरपर्यंत ग्रामीण भागातील सर्व घरात नळजोडणी करण्याचे या योजनेचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या योजनेंतर्गत एक हजार १८० योजनांची कामे हाती घेण्यात आली असून यामध्ये ४२० रेट्रोफिटिंग व ३०० नवीन योजनांचा समावेश आहे. २०१९ मध्ये ग्रामीण भागात दोन लाख ३४ हजार ६१२ कुटुंबे होती. त्यापैकी ६६ हजार ०७५ कुटुंबांना नळजोडणी देण्यात आली. त्यात सध्याच्या घडीला ग्रामीण कुटुंबांच्या संख्येत वाढ होवून ती दोन लाख ६१ हजार २७१ वर पोहोचली आहेअत.
जिल्हा परिषद प्रशासनाकडून पाणीटंचाईची दाहकता ओळखून या योजनेला गती देत, एक लाख ९७ हजार ४९८ कुटुंबांना नळजोडणी देण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. दुसरीकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून ३१ हजार ५८४ व जिल्हा परिषदेच्या अंतर्गत ३२ हजार २०० असे ६३ हजार ७८४ कुटुंबे आजही नळजोडणीच्या प्रतीक्षेत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
१३४ कोटींची बिले प्रलंबित
ठाणे जिल्हा परिषदेचा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जल जीवन मिशनला गती देण्याचा प्रयत्न करत आहे. या योजनें अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा उद्भव कोरडा जाणे, जागांचे वाद, जलवाहिनी टाकण्यासाठी जागेची समस्या, निधीची उपलब्धता आदी कारणांमुळे योजनेचे उद्दिष्ट पूर्ण होण्यास विलंब होत आहे. तर, दुसरीकडे १३४ कोटींची देणी प्रलंबित असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे या योजनेला गती द्यायची कशी, असा प्रश्न प्रशासनासमोर उभा ठाकला आहे.
ग्रामीण भागातील कुटुंबे
२०१९ २,३४,६१२
२०२६ २,६१,२७१
कुटुंबांना नळजोडणी १,९७,४९८
नळजोडणीची प्रतीक्षा
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ३१,५८४
जिल्हा परिषद ३२,२००
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.