दिघा चौकात कोंडी कायम
पादचारी पुलाअभावी वाहतूक विस्कळित; जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडावा लागतो
वाशी, ता. ६ (बातमीदार) : ट्रान्स हार्बर मार्गावरील दिघा गाव रेल्वे स्थानकासमोरील चौकात सकाळ-संध्याकाळच्या वेळी तीव्र वाहतूक कोंडी होत असून, पादचारी पुलाअभावी नागरिकांना जीव धोक्यात घालून ठाणे-बेलापूर मार्ग ओलांडावा लागत आहे. परिणामी वाहतूक व्यवस्थेचा पूर्णतः बोजवारा उडाल्याचे चित्र दिसत आहे.
एमआरव्हीसीच्या माध्यमातून उभारण्यात आलेले दिघा रेल्वे स्थानक सुरू होऊन जवळपास दोन वर्षे होत आली आहेत. मात्र अद्याप पादचारी पुलाची सुविधा उपलब्ध नसल्याने स्थानकात जाण्यासाठी नागरिकांना थेट गजबजलेल्या रस्त्यावरून मार्ग काढावा लागतो. सकाळ-संध्याकाळी गर्दीच्या वेळी प्रवाशांचे लोंढे रस्ता ओलांडताना दिसतात. यामुळे वाहतुकीचा वेग मंदावून मोठ्या प्रमाणात कोंडी निर्माण होते.
या चौकात सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली असली तरी तिचा प्रभावी वापर होत नसल्याचे दिसून येते. वाहतूक पोलिसांची तैनाती असूनही परिस्थितीवर पूर्ण नियंत्रण येत नाही. ऐरोली नॉलेज पार्क परिसरातील आयटी कंपन्यांमुळे तसेच आसपासच्या नागरी वसाहतींमुळे प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात नव्या इमारती उभारल्या जात असल्याने भविष्यात ही समस्या आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दरम्यान, दिघा गाव रेल्वे स्थानकासमोर पादचारी पुल उभारणे अत्यावश्यक आहे. पुलाअभावी अपघातांना आमंत्रण मिळत असून वाहतूक कोंडीही नित्याची झाली आहे, असे नगरसेविका अॅड. श्वेता काळे यांनी सर्वसाधारण सभेत सांगितले.
चौकट
अपघातांचा वाढता धोका
पादचारी पूल नसल्यामुळे नागरिकांना धोकादायक पद्धतीने मुख्य मार्ग ओलांडावा लागत आहे. विशेषतः गर्दीच्या वेळी अपघाताचा धोका अधिक वाढत असून, यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
चौकट
नियोजनाअभावी वाढती कोंडी
सिग्नल यंत्रणेचा अपुरा वापर, वाढती लोकसंख्या आणि वाहतुकीचे योग्य नियोजन नसल्यामुळे कोंडीची समस्या तीव्र होत आहे. पादचारी पुलासह दीर्घकालीन उपाययोजना केल्यासच या समस्येवर तोडगा निघू शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.