आठवीच्या पुस्तकातून
मराठा साम्राज्याचा
नकाशा वगळला
‘एनसीईआरटी’च्या निर्णयाला नागपूरच्या भोसलेंचे आव्हान
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : मराठा साम्राज्याचा नकाशा इयत्ता आठवीच्या सामाजिक शास्त्राच्या भाग-१ पाठ्यपुस्तकातून काढून टाकण्याच्या राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (एनसीईआरटी) निर्णयाला नागपूरच्या भोसले घराण्याने बुधवारी (ता. ६) उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
मराठा साम्राज्याचा नकाशा जुलै २०२५मध्ये संबंधित पुस्तकाच्या युनिट ३, पृष्ठ ७१वर प्रकाशित केला होता आणि त्यात इ.स. १७५९ मधील मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविण्यात आला होता; परंतु ऑक्टोबर २०२५ ते एप्रिल २०२६ या कालावधीत हा नकाशा आधी हिंदी, उर्दू आणि नंतर इंग्रजी आवृत्त्यांतून टप्प्याटप्प्याने काढून टाकण्यात आल्याचा दावा करणारी जनहित याचिका नागपूरचे मराठा राजघराण्यांचे वंशज मुधोजीराजे अजितसिंहराव भोसले, जिजाऊ घराण्याचे शिवाजी दत्तात्रयराजे जाधव आणि रायगडचे रघोजीराजे शहाजीराजे आंग्रे यांनी ॲड. आशीष गायकवाड यांच्यामार्फत केली आहे. हा निर्णय एकतर्फी, मनमानी आणि ऐतिहासिक पुरावे, अभिलेखीय नोंदी किंवा शैक्षणिक अभ्यास न तपासता घेतल्याचा दावाही याचिकेत केला आहे.
जानेवारी २०२६मध्ये माहिती अधिकारांतर्गत मिळालेल्या माहितीनुसार, निर्णय घेण्यापूर्वी आवश्यक ऐतिहासिक कागदपत्रे आणि शैक्षणिक आधार उपलब्ध नसल्याचे याचिकेत नमूद केले आहे. ही बाब केवळ एका नकाशाची नसून इतिहासाची अचूकता, प्रक्रिया न्याय आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाच्या जतनाशी संबंधित असल्याचे याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे. याबाबत केंद्र आणि राज्य सरकार, एनसीईआरटीकडे अनेक निवेदने देऊनही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे न्यायालयात धाव घेतल्याचे याचिकेत म्हटले आहे.
समितीवर मराठा इतिहासतज्ज्ञ नाही
एनसीईआरटीने ऑगस्ट २०२५ मध्ये स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीतील इतिहासतज्ज्ञ गजानन मेहेंदळेंच्या निधनानंतर रिक्त जागा भरलीच नाही. तिथे मराठा इतिहासतज्ज्ञ नेमण्याची नोंद समितीच्या इतिवृत्तात असतानाही कोणाचाही समावेश केलेला नाही. भविष्यातील बदलासाठी स्वतंत्र तज्ज्ञ समिती स्थापन करावी, पुनरावलोकन प्रक्रिया पूर्ण न करता नकाशा रोखून मग विविध भाषांच्या आवृत्त्यांतून काढण्यात आला. या निर्णयामुळे समानता, शिक्षण आणि सांस्कृतिक-ऐतिहासिक ओळखीचा अधिकार बाधित झाला आहे, असा मुद्दा याचिकाकर्त्यांनी याचिकेद्वारे मांडला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.