तीन दिवसांत २१ मद्यधुंद वाहनचालकांवर कारवाई
टोकावडे, ता. ७ (बातमीदार) : मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या चालकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मुरबाड पोलिसांच्या ताफ्यात मद्य तपासणी यंत्र दाखल करण्यात आले आहे. या यंत्राच्या साह्याने तीन ते चार दिवसांत २१ मद्यधुंद वाहनचालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी दिली.
सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने रस्त्यांवर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशा परिस्थितीत काही वाहनचालक मद्यपान करून बेदरकारपणे वाहन चालवत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढून जीवितहानीचा धोका निर्माण होत आहे. अनेकांना गंभीर दुखापतींसह कायमस्वरूपी अपंगत्वालाही सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे.
या पार्श्वभूमीवर मुरबाड पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेत मद्य तपासणी यंत्राद्वारे वाहनचालकांची तपासणी सुरू केली आहे. मुरबाड विभागाचे पोलिस अधीक्षक अनिल लाड आणि पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोटार वाहन कायद्यांतर्गत ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ मोहीम राबवून संबंधितांवर कारवाई करण्यात येत आहे.
मद्यपान करून वाहन चालवू नये, तसेच स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन मुरबाड पोलिसांनी नागरिकांना केले आहे.
मुरबाड : मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांची तपासणी करताना मुरबाड पोलिस.