घातक रसायन विसर्गप्रकरणी एमआयडीसीची तातडीची कारवाई
सकाळ इम्पॅक्ट
बोईसर, ता. ७ (वार्ताहर) : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील गटारातून काळपट व दूषित पाणी वाहत असल्याबाबत ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच एमआयडीसी प्रशासन खडबडून जागे झाले आहे. संबंधित ठिकाणी तातडीने पाहणी करून गटारांच्या भिंतीतून थेट टाकण्यात आलेल्या संशयित वाहिन्या बंदिस्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
काही उद्योगांकडून पावसाच्या पाण्याच्या नावाखाली रासायनिक मिश्रित सांडपाणी गटारात सोडले जात असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. तसेच नाले व गटारे तुडुंब भरून पर्यावरणालाही धोका निर्माण होत असल्याचे चित्र होते.
‘सकाळ’ने या गंभीर प्रकारावर प्रकाश टाकल्यानंतर एमआयडीसीने संबंधित जागी तातडीने कारवाई करत संशयित वाहिन्या बंदिस्त केल्या. प्रशासनाने या प्रकाराची अधिक चौकशी सुरू केल्याची माहिती मिळत असून नागरिकांनी ‘सकाळ’च्या वृत्तांकनाचे स्वागत केले आहे.