अंतर्गत रस्त्यांची कामे अपूर्णच
पावसाआधी कामे पूर्ण करण्याची मागणी; खोदलेल्या रस्त्यांमुळे नागरिक त्रस्त
अलिबाग, ता. ७ (वार्ताहर) : अलिबाग तालुक्यातील अंतर्गत रस्त्यांची कामे गेल्या वर्षभरापासून सुरू असली तरी अद्याप अपूर्णच असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्याच्या तोंडावर अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवलेले असून, वाहतूक एकेरी करण्यात आली आहे. त्यामुळे दररोज वाहतूक कोंडी होत असून, प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
सध्या अलिबाग-रोहा, अलिबाग-रेवदंडा तसेच चोंढी ते कार्लेखिंड या मार्गांवर रुंदीकरण व काँक्रीटीकरणाची कामे एमएसआयडीसीमार्फत सुरू आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यांची खोदकामे पूर्ण झाली असली तरी पुढील कामे संथ गतीने सुरू असल्याने परिस्थिती बिकट झाली आहे. काही ठिकाणी पुलांचे आणि मोऱ्यांचे काम सुरू असून, खड्डे खणून ठेवले आहेत. परिणामी वाहनचालकांना धोकादायक मार्गाने प्रवास करावा लागत आहे.
रात्रीच्या वेळी कामांच्या ठिकाणी कोणतीही सूचनाफलक किंवा सुरक्षा व्यवस्था नसल्याने अपघातांची शक्यता वाढली आहे. पावसाळा जवळ येत असल्याने खोदलेल्या रस्त्यांवर चिखल साचण्याची भीती व्यक्त होत आहे. हवामान विभागाने यावर्षी पावसाला लवकर सुरुवात होण्याचा अंदाज वर्तविल्याने कमी कालावधीत ही कामे पूर्ण करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
नागरिकांनी प्रशासनाने तातडीने लक्ष घालून अपूर्ण कामे पूर्ण करावीत, अशी जोरदार मागणी केली आहे. अन्यथा पावसाळ्यात परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.
चौकट :
धुळीने नागरिक त्रस्त
अलिबाग-रेवदंडा आणि चोंढी-कार्लेखिंड मार्गावरील कामे संथ गतीने सुरू असल्याने सर्वत्र माती पसरली आहे. वाऱ्यामुळे उडणाऱ्या धुळीमुळे वाहनचालक आणि परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच व्यावसायिकांचा मालही खराब होत असल्याने नाराजी वाढत आहे.
चौकट :
पावसाआधी कामे पूर्ण करणे आवश्यक
पावसाळा अगदी काही दिवसांवर येऊन ठेपल्याने खोदलेले रस्ते चिखलमय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अपघातांचा धोका वाढणार असून, ठेकेदाराने तातडीने कामे पूर्ण करावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
कोट :
सध्या सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांदरम्यान धुळीचा त्रास होऊ नये यासाठी ठेकेदाराला नियमित पाणी मारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच अपूर्ण कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यासाठीही आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत.
- दिलीप हिंगे, कार्यकारी अभियंता, एमएसआयडीसी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.