भरत उबाळे : सकाळ वृत्तसेवा
शहापूर, ता. ७ : शहापूर तालुक्यातील दुर्गम दऱ्याखोऱ्यात वसलेली कळभोंडे, नवीनवाडी, लाद्याचीवाडी व कोथळे ही चारही गावे परिसरात ठाण मांडून बसलेल्या नरभक्षक बिबट्याच्या भयाने थरथरली आहेत. रानमेवा गोळा करून कसारा, शहापूर, डोळखांब शहरातील बाजारपेठेत त्यांच्या विक्रीवर मोबदल्यावर उपजीविका करणाऱ्या आदिवासी बांधवांवर बिबट्याच्या भयाने गाव परिसरातल्या जंगलात भटकंती करण्यावरच गदा आली आहे. त्यामुळे या नागरिकांच्या उपजीविकेची समस्या गंभीर बनली आहे.
कृष्णा आगिवले (वय १०, रा. लाद्याचीवाडी) या मुलाचा २१ एप्रिलला बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. त्या दिवसापासून थरकाप उडवणारी बिबट्याची दहशत कळभोंडे, कोथळे, नवीनवाडी आणि लाद्याचीवाडी या गावांतील रहिवाशांमध्ये पसरली आहे. बिबट्यादेखील याच गावांच्या जंगलात ठाण मांडून बसला आहे. कधी भटक्या कुत्र्याला भक्ष्य बनविणे, तर शेतकऱ्यांच्या गायी, गुरांवर हल्ले चढविणे यांसारख्या घटना सुरूच आहेत. यामुळे चारही गावांतील गावकरी बिबट्याच्या दहशतीखाली आले आहेत.
बिबट्याच्या भयाने जंगलावर आधारित आर्थिक उलाढाल बंद पडल्याने किमान रोजगार हमीच्या माध्यमातून या चारही गावांतील गावकऱ्यांच्या हाताला काम द्यावे, अशी मागणी करीत सामूहिक सह्यांचे निवेदन उपवनसंरक्षकांना देण्यात आले आहे. या मागणीसाठी लाँग मार्च काढून उपवनसंरक्षक कार्यालयाला धडक देण्याची तयारी गावकऱ्यांनी सुरू केली आहे.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हालचाली कैद
बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने चार पिंजरे गावांच्या जवळ ठेवले आहेत. जंगलात झाडांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. परंतु वनविभागाच्या उपाययोजनांना बिबट्या आपसूक हुलकावणी देत असल्याने तो अद्यापही वनविभागाच्या सापळ्यात जेरबंद झालेला नाही. येथे दाखल झालेल्या बचाव पथकाच्याही तो हाती लागलेला नाही. त्याच्या हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होऊनही त्याला अद्याप जेरबंद करता आलेले नाही.
बिबट्याच्या भीतीमुळे गावकऱ्यांचे दैनंदिन व्यवहार विस्कळित झाले आहेत. आम्हा आदिवासींचे जीवनमान हे जंगलावर अवलंबून असते. परंतु त्याला बिबट्याच्या भीतीने तडा दिला आहे. उपवनसंरक्षकांनी गेल्या १५ दिवसांत एकदाही आमच्या गावाला भेट दिली नाही. आमच्या परिसरात ठाण मांडून बसलेल्या बिबट्याला लवकर जेरबंद करण्याची मागणी केली आहे.
- भालचंद्र खडके, ग्रामस्थ, कळभोंडे
उन्हाळी हंगामात रानमेवा गोळा व त्याची विक्री करून गावकरी गाठिशी पैसे बाळगतात, परंतु बिबट्याच्या भितीमुळे जंगलातील भटकंतीला मर्यादा आली आहे. वनविभागाने गावकऱ्यांच्या हाताला रोजगार द्यावा. पावसाळ्याचा नियमित हंगाम सुरू झाल्यानंतर ही समस्या आणखी वाढू शकते. त्याआधीच उपाययोजना करावी.
- जया वाख, सरपंच
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.