उलवेमधील उद्यान व हरितपट्ट्यांच्या विकासासाठी पाठपुरावा
सिडको अधिकाऱ्यांना निवेदन
उलवे, ता. ७ (बातमीदार) : उलवे नोडमधील उद्यानांचा विकास, झाडांची देखभाल आणि हरितपट्ट्यांचे संवर्धन यासाठी रायगड जिल्हा परिषद सदस्या निकिता खारकर यांनी सिडको प्रशासनाकडे पाठपुरावा केला. यासाठी त्यांनी रायगड भवन (सिडको) येथे जाऊन अधीक्षक अभियंता सावंत यांची भेट घेत विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली.
या बैठकीत उलवे नोडमधील प्रलंबित उद्याने तातडीने विकसित करणे, आधी विकसित झालेल्या उद्यानांची नियमित देखभाल करणे, तसेच रस्त्यांच्या दुभाजकांवर लावलेल्या झाडांना पुरेसा पाणीपुरवठा सुनिश्चित करणे या प्रमुख मागण्या करण्यात आल्या. याशिवाय पाण्याअभावी सुकलेल्या झाडांची पुनर्स्थापना करणे आणि मे महिन्यानंतर ज्या ठिकाणी वृक्षारोपण झालेले नाही, त्या ठिकाणी नवीन झाडे लावण्यावरही भर देण्यात आला.
त्यांनी यासंदर्भात अधिकाऱ्यांना लेखी निवेदन सादर केले. या वेळी भाजप रायगड जिल्हाध्यक्ष नीलेश खारकर, पनवेल पश्चिम युवा मोर्चा अध्यक्ष धीरज ओवळेकर, तालुका उपाध्यक्ष सुहास गोंधळी, युवा नेते प्रतीश पाटील, भाजप नेते संतोष पाटील, प्रवीण ठाकूर, नंदकुमार ठाकूर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
अधीक्षक अभियंता सावंत यांनी रस्त्यांच्या दुभाजकांवरील झाडांना येत्या गुरुवारपासून नियमित पाणीपुरवठा सुरू केला जाईल, तसेच इतर प्रलंबित समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.