वज्रेश्वरी, ता. ७ (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील मोहोंडूळ गावातील नवोदय विद्यामंदिर विद्यालयातील कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, शिक्षकांचे तब्बल चार वर्षांपासून वेतन थकीत असल्याची बाब समोर आली आहे. परिणामी, वेतन न मिळाल्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे निकाल रोखून धरल्याने पालक आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, संबंधित संस्थेने २०१३ मध्ये जागा खरेदी करून २०१४ मध्ये शाळेच्या इमारतीचे बांधकाम सुरू केले होते. त्यानंतर २०१५ मध्ये विद्यालय सुरू करण्यात आले. सुरुवातीच्या काळात शाळेचे कामकाज सुरळीत सुरू होते. मात्र, कालांतराने व्यवस्थापनाकडून शाळेकडे दुर्लक्ष होऊ लागल्याची तक्रार नागरिकांनी केली. तर शिक्षकांच्या म्हणण्यानुसार, चार वर्षांपासून त्यांना नियमित वेतन मिळत नाही. अनेकदा अपुरा अथवा उशिराने पगार देण्यात येत आहे. गेल्या वर्षी परीक्षेच्या कालावधीतही शाळा जवळपास महिनाभर बंद ठेवली होती. त्यावेळी उपसरपंच राम फर्डे यांनी पुढाकार घेत शिक्षकांना काही प्रमाणात वेतन मिळवून देत शाळा पुन्हा सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी नागरिकांनी वेतनाच्या मुद्द्यावर शाळा बंद न करण्याचे आवाहन केले होते. तसेच नवीन प्रवेश प्रक्रियेलाही स्थगिती देण्याची सूचना केली होती. व्यवस्थापनाने मात्र या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. दरम्यान, यंदाच्या शैक्षणिक वर्षातील परीक्षा पूर्ण झाल्यानंतर शिक्षकांनी थकीत वेतन मिळाल्याशिवाय निकाल जाहीर करणार नसल्याची भूमिका घेतल्याचे सांगितले जात आहे. या संपूर्ण प्रकारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिक्षण विभागाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
मुख्याध्यापक, संस्थापक अध्यक्ष अनुपस्थित
नियमानुसार १ मे रोजी लागणारा निकाल अखेर ४ मे रोजी जाहीर करण्यात आला. निकाल जाहीर करण्यावेळी शाळेत राम फर्डे, ज्ञानेश्वर ठके, दयानंद पाटील, नितेश भोईर आणि मयूर तारमळे यांच्यासह प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अदिती भोईर, शिक्षिका निशा जोशी, रुचिता जाधव आणि शिपाई अनिल खांडेकर हेही उपस्थित होते. मात्र, मुख्याध्यापक भुसारे सर, अकरावी-बारावी विभागाचे मुख्याध्यापक अजित कांबळे; तसेच संस्थापक अध्यक्ष प्रेमचंद तिवारी हे अनुपस्थित असल्याचे समोर आले.
संस्थापकांनी प्रतिक्रिया टाळली
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रेमचंद तिवारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांनी या प्रकरणावर बोलण्यास टाळाटाळ करत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे शिक्षकांचे थकीत वेतन आणि विद्यार्थ्यांचे रोखलेले निकाल याबाबत पालक व ग्रामस्थांमध्ये अधिक संभ्रम निर्माण झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.