नवी मुंबई, ता. ७ (वार्ताहर) : ऐरोली-काटई उन्नत मार्गावरील उड्डाणपुलाच्या कामासाठी अवजड क्रेन उभी करण्यात येणार आहे. या कामामुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नवी मुंबई वाहतूक विभागाने शुक्रवारी (ता. ८) रात्री ११ वाजल्यापासून ते शनिवारी (ता. ९) पहाटे ६ वाजेपर्यंत ऐरोलीतील वाहतुकीत विशेष बदल करण्यात आले आहेत. नवी मुंबई वाहतूक विभागाने याबाबतची अधिसूचना जारी केली आहे.
ऐरोली ते काटई या उन्नत मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या मार्गावरील ऐरोली येथील भारत बिजली या कंपनीजवळ गर्डर टाकण्यात येणार आहे. या कामासाठी अवजड क्रेन उभी करण्यात येणार आहे. त्यामुळे या ठिकाणी कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रस्ता पादचारी आणि प्रकल्पाच्या कामाची वाहने वगळता इतर सर्व प्रकारच्या वाहनांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी वाहतूक विभागाने पर्यायी मार्ग सुचवले आहेत. ऐरोली सेक्टर १६, १७, १९ आणि २० कडे जाणारी वाहने, तसेच सेक्टर १, २, ३ आणि ४ मधून येणाऱ्या वाहनाना ऐरोली गाव मार्गे आपल्या इच्छित स्थळी जाण्यासाठी पर्याही मार्ग निश्चित केला आहे. तसेच सेक्टर ३ मधून जाणाऱ्या वाहनांना अग्निशमन केंद्र चौक ते पोस्ट ऑफिस मार्गे सेक्टर १६, १७, १९ आणि २० कडे प्रवास करता येणार आहे.