ठाणे जिल्ह्यात धुळीचे वादळ
सकाळ वृत्तसेवा
ठाणे/डोंबिवली, टिटवाळा, ता. ७ ः ठाणे जिल्ह्यात गुरुवारी अचानक धुळीचे वादळ आणि अवकाळी पावसाने हजेरी लावली. कल्याण, डोंबिवली, दिवा, मलंगगड परिसरासह ग्रामीण भागातही धुळीची वादळसदृश परिस्थिती निर्माण झाली. टिटवाळा आणि मुरबाड परिसरात जोरदार वारे, धुळीचे लोट आणि झाडे पडल्याने जनजीवन विस्कळित झाले.
गुरुवारी दुपारनंतर हवामानातील अचानक बदलामुळे ठाणे जिल्ह्यात धुळीचे वादळ आणि अवकाळी पावसाचा तडाखा पाहायला मिळाला. ठाणे शहर, कल्याण-डोंबिवली, टिटवाळा, आंबिवली, शहाड तसेच मुरबाड परिसरात जोरदार वारे, धुळीचे लोट आणि काही ठिकाणी पावसामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळित झाले.
ठाणे शहरात सकाळपासूनच उष्णतेची तीव्रता जाणवत होती. सायंकाळी ४.३०च्या सुमारास घोडबंदर भागात अचानक वातावरणात अंधार दाटून आला आणि सोसाट्याच्या वाऱ्यास सुरुवात झाली. परिसरात सुरू असलेल्या मेट्रो आणि रस्ते कामांमुळे मोठ्या प्रमाणात धूळ हवेत उडाली. त्यामुळे वाहनचालकांना वाहनांचा वेग कमी करावा लागला. काही दुचाकीस्वारांनी रस्त्याच्या कडेला गाड्या थांबवून आडोशाला उभे राहणे पसंत केले. सुमारे १५ मिनिटांनंतर परिस्थिती पूर्ववत झाली.
कल्याण, डोंबिवली, दिवा, मलंगगड परिसरासह ग्रामीण भागातही धुळीची वादळसदृश परिस्थिती निर्माण झाली. सायंकाळी ४च्या सुमारास अचानक आलेल्या वाऱ्यामुळे रस्ते, इमारती आणि झाडांवरील धूळ हवेत उडून संपूर्ण परिसर धुळीच्या चादरीखाली झाकोळल्याचे चित्र दिसून आले. काही ठिकाणी दृश्यमानता कमी झाल्याने वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागला.
टिटवाळा, आंबिवली आणि शहाड परिसरात दुपारी ३.३०च्या सुमारास आलेल्या धुळीच्या वादळामुळे भरदुपारी अंधार पसरला होता. जवळपास अर्धा तास सुरू असलेल्या या वादळामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. असे भीषण वादळ प्रथमच अनुभवले, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.
----
अवकाळी पावसामुळे मुरबाडमध्ये नुकसान
मुरबाड तालुक्यातही अवकाळी पावसासह वादळी वाऱ्याने हजेरी लावली. मुरबाड-संगम रस्त्यावर दोन ते तीन ठिकाणी मोठी झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक विस्कळित झाली. शिवले कॉलेज रस्त्यावरही झाडांच्या फांद्या तुटून पडल्या. अवकाळी पावसामुळे वीटभट्ट्यांचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे; मात्र उकाड्याने त्रस्त नागरिकांना या पावसामुळे काहीसा गारव्याने दिलासा मिळाला.
-----
रायगडमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस
पोलादपूर (बातमीदार) : रायगड जिल्ह्यातील खालापूर, महाड, पोलादपूर तालुक्यातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने गुरुवारी दुपारी हजेरी लावली असून, ढगाळ वातावरणासह वादळी वारा व पाऊस यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. तसेच आंबा पिकालादेखील या वादळी पावसाचा मोठा फटका बसला असून वादळामुळे अनेक ठिकाणी आंब्याचे नुकसान झाले. मोठ्या प्रमाणात धुळीचे वादळ आणि सोसाट्याचा वारा सुटला होता. त्यानंतर काही वेळातच पावसाने जोरदार हजेरी लावली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.