नवी मुंबईत ‘झीरो वेस्ट स्लम’ मॉडेल
निराधार महिलांना मिळतोय आधार
वाशी, ता. ७ (बातमीदार)ः नवी मुंबई महापालिकेकडून राबविण्यात येणारे ‘झीरो वेस्ट स्लम’ मॉडेल सध्या निराधार महिलांसाठी मोठा आधार ठरत आहे. कचरा वेचक महिलांचे सक्षमीकरण आणि कचऱ्यावर त्याच ठिकाणी प्रक्रिया करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेला हा प्रकल्प सामाजिक व आर्थिकदृष्ट्या परिणामकारक ठरत आहे.
झोपडपट्टी भागांमध्ये पाच ठिकाणी हे सेंटर सुरू करण्यात आले असून, प्रत्येक ठिकाणी नऊ महिला आणि एक पर्यवेक्षक असे एकूण १० जण कार्यरत आहेत. त्यामुळे सुमारे ५० महिलांना नियमित रोजगार उपलब्ध झाला आहे. या माध्यमातून महिलांचे उत्पन्न वाढून त्यांचा आत्मविश्वासही बळकट होत आहे.
या प्रकल्पांतर्गत ज्या भागांत घंटागाडी पोहोचत नाही, तेथे महिला घराघरातून कचरा गोळा करतात. गोळा केलेला ओला व सुका कचरा वेगळा करून ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती केली जाते. एका सेंटरमध्ये दररोज सुमारे दोन हजार घरांमधून १.८ मेट्रिक टन कचरा जमा होतो. या प्रक्रियायुक्त कचऱ्याच्या विक्रीतून मिळणारे उत्पन्न महिलांच्या बचत गटांमार्फत त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी वापरले जात आहे.
या उपक्रमामुळे पालिकेचा खर्चही मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. पूर्वी दोन हजार घरांमधील कचरा संकलनासाठी १.३२ लाख रुपये खर्च येत होता, तो आता ६५ हजार रुपयांपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे दरमहा सुमारे ५१ हजार रुपयांची बचत होत आहे.
सध्या ऐरोली, दिघा, तुर्भे आणि कोपरखैरणे परिसरात हा प्रकल्प यशस्वीपणे राबवला जात असून नागरिकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
कोट
झीरो वेस्ट स्लम मॉडेलला चांगला प्रतिसाद मिळत असून-, यामुळे महिलांना रोजगार आणि पालिकेला बचत दोन्ही साध्य होत आहे.
- डॉ. अजय गडदे, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन)
चौकट
रोजगारनिर्मिती आणि आर्थिक बचत
या प्रकल्पामुळे ५० निराधार महिलांना नियमित काम मिळाले आहे. कचरा व्यवस्थापनाच्या प्रक्रियेत सहभागी होताना त्यांना आर्थिक स्वावलंबन मिळत असून, त्यांच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यास मदत होते. कचऱ्यावर स्थानिक पातळीवर प्रक्रिया केल्याने वाहतूक व संकलन खर्च कमी झाला आहे. परिणामी पालिकेची दरमहा सुमारे ५१ हजार रुपयांची बचत होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.