सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ८ : इराण-अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात गॅस टंचाई निर्माण होण्याची शक्यता असताना सरकारकडून विविध गृहनिर्माण संस्थांमध्ये गॅसवाहिनी जोडणीला प्राधान्य दिले जात आहे. मात्र, याच परिस्थितीचा गैरफायदा घेत ‘महानगर गॅस’च्या नावाने ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार कल्याण-डोंबिवली परिसरात वाढत असल्याचे समोर आले आहे.
गॅसजोडणी, नोंदणी अद्ययावत करणे किंवा स्थापन प्रक्रियेच्या नावाखाली नागरिकांना व्हॉट्सअॅपवर संशयास्पद संदेश पाठवून आर्थिक फसवणूक केली जात असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. फसवणूक करणारे स्वतःला ‘महानगर गॅस’चे प्रतिनिधी असल्याचे सांगून नागरिकांशी संपर्क साधत आहेत. पेमेंट झाल्यावर स्क्रीनशॉट पाठवा, इंजिनिअरचा नंबर पाठवला जाईल, इन्स्टॉलेशन करून घ्या, अशा प्रकारचे संदेश पाठवून नागरिकांचा विश्वास संपादन केला जातो. यानंतर महानगर गॅस ग्राहक क्रमांक अपडेट.एपीके नावाची फाइल व्हॉट्सअॅपवर पाठवली जाते. ही फाइल डाउनलोड केल्यानंतर मोबाईलमधील बँकिंग माहिती, ओटीपी, पासवर्ड तसेच इतर वैयक्तिक माहिती चोरीला जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सायबर तज्ज्ञांच्या मते, अशा एपीके फाइलच्या माध्यमातून मोबाईलमध्ये घातक सॉफ्टवेअर इन्स्टॉल केले जाते. त्यानंतर संबंधित व्यक्तीच्या मोबाईलवरील बँकिंग अॅप्स, संपर्क माहिती आणि वैयक्तिक डेटावर हॅकर्सना प्रवेश मिळतो आणि बँक खात्यातील रक्कम परस्पर काढून घेतली जाते.
पलावा परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याने काही गृहनिर्माण संस्थांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत नोटीस बोर्डवर सतर्कतेच्या सूचना लावल्या आहेत. सामाजिक कार्यकर्ते महेश ठोंबरे यांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करत, फसवणूक झाल्यास तातडीने सायबर पोलिसांकडे तक्रार करण्याचे सांगितले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.