सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ८ : खारीगाव ते गायमुख हा १३ किलोमीटर लांबीचा कोस्टल मार्ग ठाण्यासाठी ‘गेम चेंजर’ प्रकल्प ठरणार असून, डिसेंबर २०२८ पर्यंत वाहतुकीसाठी खुला होणार आहे. या प्रकल्पामुळे घोडबंदर मार्गासह अंतर्गत रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली. तसेच कांदळवन क्षेत्रातील अडथळे दूर करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. आमदार केळकर यांनी गुरुवारी एमएमआरडीएचे मुख्य अभियंता आणि कंत्राटदार कंपनीच्या अधिकाऱ्यांसह बाळकुम येथे प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी अधिकाऱ्यांनी प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा सादर केला. सध्या या प्रकल्पाचे सुमारे २८ टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली.
प्रकल्पाची पाहणी करताना अधिकाऱ्यांनी प्रगतीबाबत माहिती दिली. खारीगाव, बाळकुम ते गायमुख असा ठाणे खाडीच्या काठाने जाणारा हा सहापदरी कोस्टल मार्ग सुमारे दोन हजार ७२७ कोटी रुपये खर्चाचा आहे. या मार्गामुळे खारीगाव ते गायमुख दरम्यानचा प्रवासाचा वेळ ४५ मिनिटांवरून अवघ्या १५ मिनिटांपर्यंत कमी होणार आहे. विशेष म्हणजे, या मार्गामुळे मुंबई-नाशिक महामार्ग, जेएनपीटी तसेच वाढवण बंदराला पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेने मालवाहतुकीसाठी वेगवान जोडणी मिळणार आहे. सुमारे सहा महिन्यांपूर्वी या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली असून पुढील ४० महिन्यांत ते पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या मार्गातील काही भाग कांदळवन क्षेत्रातून जात असल्याने तेथे एलिव्हेटेड रचना उभारण्यात येणार आहे. प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक परवानग्या आणि अडथळे दूर करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्याचे केळकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
दरम्यान, घोडबंदर मार्गावरील अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे ठाणेकरांना कोंडीचा सामना वर्षभर करावा लागतो. या प्रकल्पामुळे या वाहतुकीवरचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. कळव्यातून होणाऱ्या वाहतुकीलाही दिलासा मिळणार असल्याची माहिती केळकर यांनी दिली. या वेळी आढावा बैठकीत संजय पाटील, सूरज दळवी, जितेंद्र मढवी व अधिकारी वर्ग उपस्थित होते.
………………
कांदळवनावर अतिक्रमण
कोस्टल रोडचा काही भाग कांदळवनाच्या ठिकाणी एलिव्हेटेड असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याचे पाहणी दौऱ्यात आढळून आले. काही ठिकाणी अनधिकृत बांधकामे सुरू असून काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात मातीचा भराव टाकण्यात आला आहे. ही अतिक्रमणे कोस्टल रोड प्रकल्पाला अडथळा ठरणार असून ती तातडीने दूर करण्यात यावीत, अशा सूचना आमदार संजय केळकर यांनी कांदळवन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.