मुंबई देशातील चौथी सर्वात सुरक्षित महानगरी
दर लाख लोकसंख्येमागे मुंबईत ३८० गुन्हे; महिलाविरोधी गुन्ह्यांत आठवा क्रमांक
जयेश शिरसाट ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ ः नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने (एनसीआरबी) आर्थिक राजधानी मुंबई अन्य महानगरांच्या तुलनेत सुरक्षित असल्याचे विश्लेषण मांडले आहे. लोकसंख्येच्या तुलनेत काढलेला गुन्हे दर किंवा गुन्ह्यांचे प्रमाण लक्षात घेतल्यास देशातील १९ महानगरांपैकी कोलकता, पुणे, कोइंबतूरनंतर मुंबई सर्वात सुरक्षित शहर असल्याचे एनसीआरबीने ताज्या अहवालात नमूद केले आहे.
या अहवालानुसार २०२४ मध्ये राजधानी दिल्लीत सर्वाधिक २.९७ लाख गुन्हे नोंद झाले. नोंद गुन्ह्यांच्या यादीत मुंबई (७० हजार) दुसऱ्या, सुरत (६३ हजार) तिसऱ्या, बंगळूर (५७.५ हजार) चौथ्या आणि चेन्नई(४५ हजार) पाचव्या स्थानी आहे.
किती गुन्हे नोंद झाले यापेक्षा लोकसंख्येच्या तुलनेत गुन्ह्याचा दर किती आहे यावरून शहरे, राज्ये सुरक्षित की असुरक्षित ते ठरवले जाते आणि त्यानुसार उपाययोजना केल्या जातात.
एनसीआरबीनुसार २०२४ मध्ये १९ महानगरांमध्ये सर्वाधिक १.८४ कोटी मुंबईची लोकसंख्या होती. त्या खालोखाल राजधानी दिल्लीची १.६३ कोटी, कोलकताची १.४१ कोटी, चेन्नईची ८७ लाख, तर बंगळूरची ८५ लाख लोकसंख्या होती, तर महानगरांच्या यादीतील पाटणा, कोझिकोडे, कोची, इंदूर, गाझियाबाद आणि कोइंबतूर या शहरांची लोकसंख्या २५ लाखांच्या आत आहे.
या विषम लोकसंख्येच्या शहरांची घडलेल्या गुन्ह्यांनुसार क्रमवारी ठरवताना दर लाख लोकसंख्येमागील गुन्ह्यांचे प्रमाण काढण्यात येते. त्यालाच गुन्हे दर किंवा गुन्ह्यांचे प्रमाण असे संबोधले जाते.
या गुन्हे दरानुसार राजधानी दिल्लीत २०२४ मध्ये दर लाख लोकसंख्येमागे सर्वाधिक १,८२५ गुन्हे घडले. त्यामुळे हे शहर सर्वाधिक असुरक्षित असल्याचा निष्कर्ष काढला जात आहे. दिल्ली खालोखाल गुजरातच्या सुरतमध्ये १,३७८, राजस्थानच्या जयपूरमध्ये १,२०२, उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये १,०८३ तर केरळच्या कोची शहरात १,०१६ गुन्हे दर एक लाख लोकसंख्येमागे घडले आहेत.
या यादीत सर्वात तळाशी अलीकडेच निवडणुकीच्या रणधुमाळीत सत्तांतर पाहणारे आणि भाजप नेत्याच्या स्वीय सहाय्यकाच्या हत्येने राजकीयदृष्ट्या अशांत झालेल्या पश्चिम बंगालचे कोलकता शहर येते. कोलकतामध्ये दर लाख लोकसंख्येमागे फक्त ९४ गुन्ह्यांची नोंद झाली. महाराष्ट्राच्या पुणे शहरात ३६८, तमिळनाडूच्या कोइंबतूरमध्ये ३६९, तर मुंबईत ३८० गुन्हे घडले आहेत. त्यामुळे गुन्ह्यांच्या दरानुसार सुरक्षित शहरांची क्रमवारी लावल्यास मुंबई शहर चौथ्या स्थानावर येते, असे हा अहवाल सांगतो.
दर लाख लोकसंख्येमागील गुन्ह्यांत मुंबई कुठे?
एकूण गुन्हे
सर्वात सुरक्षित शहर कोलकता - ९४ गुन्हे
सर्वात असुरक्षित शहर दिल्ली - १,८२५ गुन्हे
मुंबई ३८० गुन्हे (सुरक्षित शहरांच्या यादीत चौथा क्रमांक)
२. महिलाविरोधी गुन्हे
सर्वात सुरक्षित शहर चेन्नई - २५ गुन्हे
सर्वात असुरक्षित शहर जयपूर - १९९ गुन्हे
मुंबई ७५ गुन्हे (सुरक्षित शहरांच्या क्रमवारीत आठव्या स्थानी)
३. बालकांविरोधी अत्याचार
(बालकांची लोकसंख्या उपलब्ध नसल्याने एकूण लोकसंख्येनुसार)
सर्वात सुरक्षित शहर कोलकता - ३
सर्वात असुरक्षित शहर इंदूर - ५३
मुंबई १८ गुन्हे (सुरक्षित शहरांच्या यादीत दहावा क्रमांक)
४. आर्थिक गुन्हे
सर्वात सुरक्षित शहर अहमदाबाद - १३ गुन्हे
सर्वात असुरक्षित शहर जयपूर -१७८ गुन्हे
मुंबई- ४२ गुन्हे (सुरक्षित शहरांच्या यादीत तेराव्या स्थानी)
५. सायबर गुन्हे
सर्वात सुरक्षित शहर दिल्ली - ३ गुन्हे
सर्वात असुरक्षित शहर बंगळूर - २०६ गुन्हे
मुंबई २७ गुन्हे (सुरक्षित शहरांच्या यादीत पंधराव्या स्थानी)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.