रुग्णालयांची आयुक्तांकडून झाडाझडती
आरोग्यसेवांतील त्रुटींवर नाराजी; सुधारणा करण्याचे आदेश
वाशी, ता. ८ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये आरोग्यसेवांचा दर्जा उंचावण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली जात असून, नागरिकांना अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुढील पाच ते सहा महिन्यांत एन्जिओप्लास्टी सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिली. ऐरोली येथील राजमाता जिजाऊ रुग्णालय, तुर्भे माता-बाल रुग्णालय तसेच वाशी रुग्णालयाची पाहणी करत त्यांनी आरोग्यसेवांचा सखोल आढावा घेतला.
पाहणीदरम्यान रुग्णालयांतील विविध त्रुटींवर आयुक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. केसपेपर कक्षातील गोंधळ, मार्गदर्शक फलकांचा अभाव, तसेच सोनोग्राफी विभागातील डॉक्टरांच्या उशिरा उपस्थितीमुळे रुग्णांना होणारा त्रास समोर आला. विशेषतः महिलांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत असल्याने त्या विभागात मनुष्यबळ वाढविण्याचे आदेश देण्यात आले. याशिवाय स्वच्छता, कर्मचारी उपस्थिती आणि सेवा व्यवस्थापनात तातडीने सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
पाहणीदरम्यान अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने बॅकअप यंत्रणा सक्षम करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच रुग्णांना वेळेत सेवा देणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट करत प्रशासनाला फटकारण्यात आले. रुग्णालयांमध्ये डिजिटायझेशन वाढवून केसपेपर आणि वैद्यकीय माहिती सुलभ करण्यावरही भर देण्यात आला.
ऐरोली रुग्णालयात ईएनटी, ऑर्थो, डेंटल सेवा अधिक सक्षम करण्याबरोबरच इन्फर्टिलिटी आणि गॅस्ट्रोलॉजी सेवा सुरू करण्यासाठी नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले. पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांची कमतरता दूर करण्यावरही भर देण्यात आला. मॉड्युलर ऑपरेशन थिएटरचा पूर्ण क्षमतेने वापर, रुग्णांच्या आहाराची गुणवत्ता आणि ब्लड बँक व मिल्क बँक सुविधा सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले.
चौकट
ॲँजिओप्लास्टी सुविधा
महापालिका रुग्णालयांमध्ये पुढील पाच ते सहा महिन्यांत अँजिओप्लास्टी सेवा सुरू होणार आहे. हृदयविकाराच्या रुग्णांसाठी ही सुविधा अत्यंत महत्त्वाची ठरणार असून, खासगी रुग्णालयांतील महागड्या उपचारांपासून दिलासा मिळणार आहे. अत्याधुनिक उपकरणे, प्रशिक्षित तज्ज्ञ डॉक्टर आणि आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यावर भर दिला जाणार आहे. या सुविधेमुळे आपत्कालीन परिस्थितीत त्वरित उपचार शक्य होऊन रुग्णांचे जीव वाचण्यास मदत होणार आहे.
चौकट
एमआरआय सुविधा
वाशी सार्वजनिक रुग्णालयात अत्याधुनिक थ्री टेस्ला एमआरआय सेवा लवकरच सुरू होणार आहे. मेंदू, पाठीचा कणा, हृदय, कर्करोग यांसारख्या गंभीर आजारांच्या अचूक निदानासाठी ही चाचणी महत्त्वाची मानली जाते. साधारण १५ हजार रुपये खर्च असलेली ही तपासणी महापालिकेमार्फत सवलतीच्या दरात उपलब्ध होणार आहे. नागरिकांना परवडणाऱ्या दरात दर्जेदार निदान सेवा मिळाव्यात, हा या उपक्रमाचा उद्देश असून, भविष्यात इतर महापालिका रुग्णालयांमध्येही ही सुविधा विस्तारण्याचा विचार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.