वाशी, ता. ८ (बातमीदार) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारीमध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी (ता. ८) दुपारी ऑनलाइन जाहीर करण्यात आला. नवी मुंबई महापालिका क्षेत्राचा एकूण निकाल ९६.२७ टक्के लागला असून, यंदाही मुलींनी गुणवत्तेत बाजी मारत आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रातून यंदा एकूण १५ हजार ३०५ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केला होता. त्यापैकी १५ हजार २६७ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसले होते. यामधून १४ हजार ६९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या काही वर्षांप्रमाणे यंदाही नवी मुंबईचा निकाल राज्याच्या सरासरीपेक्षा अधिक लागल्याने विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. निकालात मुलींनी पुन्हा एकदा आपली सरस कामगिरी सिद्ध केली आहे. नवी मुंबईत मुलींचा निकाल ९७.३५ टक्के लागला असून, मुलांचा निकाल ९५.२८ टक्के नोंदविण्यात आला आहे. मुलींच्या सातत्यपूर्ण यशामुळे शिक्षण क्षेत्रात त्यांची प्रगती अधोरेखित झाली आहे. नवी मुंबई महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनीदेखील यंदाच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळविल्याने शिक्षक व पालकांकडून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
दुपारी १ वाजता ऑनलाइन निकाल जाहीर होताच शहरातील विविध भागांमध्ये विद्यार्थ्यांनी मोबाईल फोन आणि इंटरनेट केंद्रांवर निकाल पाहण्यासाठी गर्दी केली होती. अनेक विद्यार्थ्यांनी मित्र-मैत्रिणींसोबत निकाल पाहत आनंद साजरा केला. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी एकमेकांना मिठी मारत जल्लोष केला, तर पालकांनीही आपल्या मुलांच्या यशाचा आनंद व्यक्त केला. यशस्वी विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.