अंबरनाथ, ता. ८ (वार्ताहर) : अंबरनाथ नगरपालिकेच्या राजकारणात यंदा केवळ पक्षीय समीकरणांचीच नव्हे, तर ‘राजकीय जोड्यांची’ ही जोरदार चर्चा रंगली आहे. नगराध्यक्षांपासून स्वीकृत नगरसेवकांपर्यंत आणि नगरसेवकांपासून नगरसेविकांपर्यंत तब्बल चार जोड्या आता पालिकेच्या राजकारणात सक्रिय झाल्याने ‘पालिका की फॅमिली पॉलिटिक्स?’ अशी मिश्किल चर्चा शहरात सुरू झाली आहे.
७ मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी अंबरनाथ नगरपालिकेच्या बहुचर्चित गटवैधतेचा निकाल जाहीर केला. या निकालानंतर शिवसेनेने पुन्हा एकदा शहरात आपले वर्चस्व सिद्ध करत जल्लोष केला. मात्र, या जल्लोषात फटाक्यांइतकीच चर्चा झाली ती पालिकेतील ‘चार पॉवरफुल जोड्यांची’. अंबरनाथ नगरपालिकेच्या २० डिसेंबर २०२५ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत अनेक दिग्गजांनी नशीब आजमावले. काहींना यश मिळाले, तर काहींना अपयश आले. मात्र, या सगळ्यात लक्ष वेधून घेतले ते राजकारणातील ‘कपल कनेक्शन’ने. यामध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेली जोडी म्हणजे मनसेतून शिवसेनेत आलेले नगरसेवक कुणाल भोईर आणि अपर्णा भोईर. दोघांनीही आपल्या कामाच्या जोरावर नागरिकांची मने जिंकत निवडणुकीत दमदार विजय मिळवला. ‘घरातही रणनीती आणि पालिकेतही एकजूट’ अशी चर्चा त्यांच्या बाबतीत रंगताना दिसत आहे. तर दुसरीकडे भाजपच्या नगराध्यक्ष तेजश्री करंजुळे-पाटील या थेट जनतेतून निवडून आल्या. त्यानंतर त्यांचे पती विश्वजित करंजुळे-पाटील यांची भाजपच्या स्वीकृत नगरसेवकपदी वर्णी लागल्याने नगराध्यक्ष आणि नगरसेवक अशी जोडी आता पालिकेच्या केंद्रस्थानी आली आहे.
दरम्यान, नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नगरसेवक सचिन पाटील यांच्या पत्नी अश्विनी सचिन पाटील यांना जिल्हाधिकाऱ्यांनी स्वीकृत नगरसेविका म्हणून मान्यता दिली. त्यामुळे राष्ट्रवादीचीही फॅमिली एंट्री पालिकेत निश्चित झाली आहे. एकूणच, अंबरनाथ पालिकेत आता चार जोड्यांची ‘राजकीय चौकडी’ रंगणार असून, सभागृहातील निर्णयांपासून ते रणनीतीपर्यंत या जोड्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याची चर्चा शहरभर रंगू लागली आहे. पालिका बैठका रंगणार की कौटुंबिक समन्वय झळकणार? याकडे आता अंबरनाथकरांचे लक्ष लागले आहे.
चर्चेची जोडी
राजकीय वर्तुळात आणखी एक चर्चेची जोडी ठरली ती उमेश पाटील आणि दर्शना उमेश पाटील यांची. काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेल्या दर्शना पाटील यांनी भाजपला साथ दिल्यानंतर त्यांची काँग्रेसमधून हकालपट्टी झाली. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. याचवेळी त्यांचे पती आणि माजी नगरसेवक उमेश पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश करत स्वीकृत नगरसेवकपद मिळवले. त्यामुळे राजकीय घरवापसी की भाजपची नवी रणनीती? अशा चर्चांना उधाण आले आहे.
अंबरनाथ : नगरपालिकेतील चर्चेत असलेल्या राजकीय जोड्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.