भिवंडी, ता. ११ (बातमीदार) : श्री भिमेश्वर मंदिर या शहराच्या पुरातन ग्रामदैवत मंदिराच्या वंशपरंपरागत पुजाऱ्यांना जव्हार संस्थानाच्या सनदेनुसार मिळणारा दिवाबत्ती व उत्सव खर्च अनेक वर्षांपासून सरकारच्या लालफितीत अडकला आहे. १९७७ पासून हा खर्च बंद झाल्याने मंदिराचा दैनंदिन खर्च पुजारी कुटुंबीयांना स्वतः करावा लागत आहे. वाढत्या महागाईमुळे त्यांची आर्थिक कोंडी होत असून प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.
भिवंडीतील ब्राह्मणआळी परिसरातील श्री भिमेश्वर मंदिर शहराचे ग्रामदैवत मानले जाते. या मंदिरावरूनच शहराला ‘भिवंडी’ नाव पडल्याची माहिती स्थानिक देतात. मंदिरात पहाटेपासून रात्रीपर्यंतची पूजा-अर्चना, स्वच्छता, नंदादीप, दिवाबत्ती; तसेच विविध धार्मिक उत्सवांची सेवा दहा पिढ्यांपासून सुरेंद्र गुरव (शिंदे) यांचे कुटुंब वंशपरंपरेने करत आहेत. या मंदिरासाठी जव्हार संस्थानाचे राजे यशवंतराव मार्तंडराव मुकणे यांनी पुजारी कुटुंबाला सनद दिली होती. त्यानुसार संस्थानाकडून दिवाबत्ती व उत्सव खर्च दिला जात होता. स्वातंत्र्यानंतर हा खर्च तहसील कार्यालयामार्फत पुजारी कुटुंबाला मिळत होता; मात्र १९७७ नंतर तो थांबल्याचा दावा करण्यात आला आहे. सध्या वाढत्या महागाईमुळे मंदिराचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. केवळ वार्षिक ३० रुपयांचे मानधन अपुरे असल्याने प्रचलित कायदे आणि मानवी हक्कांच्या आधारे मानधनात वाढ करण्यात यावी, अशी मागणी सुरेंद्र गुरव यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांकडे केली आहे. दरम्यान, मंदिराचा दैनंदिन खर्च आणि धार्मिक परंपरा टिकवण्यासाठी लागणारा आर्थिक भार गुरव कुटुंब उचलत आहे. त्यामुळे सरकारने सकारात्मक भूमिका घेत सनदेनुसार मिळणारा दिवाबत्ती खर्च तातडीने मंजूर करावा, अशी मागणी पुन्हा एकदा पुढे आली आहे.
न्यायालयात याचिका
याप्रकरणी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक प्रशासनाला कार्यवाहीचे निर्देश दिले. त्यानुसार मंडळ अधिकाऱ्यांनी ३ ऑगस्ट २०२२ मध्ये मंदिरात प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा केला. मात्र, त्यानंतरही शासकीय स्तरावर कोणतीही ठोस हालचाल झालेली नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.