पाण्यासाठी जीव कासावीस
पालघर जिल्ह्यातील गावपाड्यांवर पाण्याचे दुर्भिक्ष
निखिल मेस्त्री ः सकाळ वृत्तसेवा
पालघर, ता. ११ ः जिल्ह्यात राष्ट्रहिताचे प्रकल्प होत असताना ग्रामीण भागातील पाणीटंचाईची साडेसाती आजही कायम आहे. केंद्र, राज्य सरकारकडून प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे शुद्ध पाणी पोहोचवण्याच्या घोषणा होत असताना आदिवासीबहुल असलेल्या वाडा, मोखाडा, जव्हार तालुक्यातील २४ गावे, ७९ टंचाईग्रस्त पाड्यांना आठवड्याला तब्बल ८६ लाख ६४ हजार लिटर पाणी टँकरने देण्याची वेळ प्रशासनावर ओढवली आहे.
धरणांचा जिल्हा असा नावलौकिक असला तरी ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ अशी परिस्थिती पालघर जिल्ह्यातीस ग्रामीण भागातील नागरिकांची झाली आहे. अनेक भागांमध्ये आजही पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने विहिरी, कूपनलिका पारंपरिक जलस्रोत आटले आहेत. अनेक गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. परिणामी, प्रशासनाला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली असून मोखाडा, जव्हारसारख्या तालुक्यांमध्ये महिलांना पाण्यासाठी दोन-दोन तास वणवण करावी लागते.
----------------
८६ लाख लिटरचा पुरवठा
वाडा तालुक्यात सहा टँकर, मोखाडा तालुक्यात नऊ तर जव्हार तालुक्यात १७ टँकर पाणीपुरवठ्यासाठी तैनात आहेत. वाड्यात २०.११, मोखाड्यात २३ तर जव्हारमध्ये दररोज टँकरच्या ५३ फेऱ्या होत आहेत. १२ ते २४ हजार लिटर क्षमतेच्या टँकरमधून तिन्ही तालुक्यांमधून ९६.११ म्हणजेच १२ लाख ३७ हजार लिटर पाणी पुरवले जाते. तर आठवड्याला ८६ लाख ६४ हजार लिटर पाणी गावपाड्यांमध्ये दिले जात आहे.
----------------
‘या’ गावांना सर्वाधिक झळ
वाडा - ओगदा, ठुणावे, तुसे, आखाडा-वडवली, कुयलू, तोरणे, चेंदवली, घोणसई, जामघर, लखमापूर, पिंपळास, मुसारणी, मोज, कादिवली गावांमधील पाड्यांवर पाणीटंचाई आहे.
मोखाडा - आसे, पाथर्डी, सायदे, काष्टी, धामणी, पळसुंडा, घानवळ, धामणशेत, गोमघर, नाशेरा, बोटोशी, हिरवे, पोशेरा, सातुर्ली, पळसुंडा, चास गावांना १२ हजार लिटरच्या टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
जव्हार - वावर, वांगणी, जुनी जव्हार, रायतळे, कासटवाडी, जांभूळ माथा, सारसून, हिरडपाडा, आपटाळे, धिवंडा, कोगदा, न्याहाळे खुर्द, आपटाळे, रामपूर, बोपदरी, कुतुर विहीर, किरमिरा, दाभोळून, काशिवली क्रमांक एक, कोल्लाळे, पाथर्डी, गडाची मेट, धानोशी, जयेश्वर, राजेवाडी गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.
---------------------------
पाणीटंचाईचे चित्र
तालुके : वाडा, मोखाडा, जव्हार
गावे : २४
पाडे : ७९
नागरिकांची संख्या : ३६,३३७
पशुधन्यांची संख्या : १४,३७३
टँकर : ३२
दररोजच्या टँकरच्या फेऱ्या : ९६.११
आठवड्यातील टँकरच्या फेऱ्या : ६७३
----------------------
दैनंदिन जीवन विस्कळित
‘जल जीवन मिशन’अंतर्गत कोट्यवधींच्या पाणी योजनांची कामे झाली आहेत; पण प्रत्यक्षात नळांना पाणी नसल्याची तक्रार ग्रामस्थांकडून केली जात आहे. प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असल्याचा दावा केला जात असला तरी अनेक दुर्गम पाड्यांवर टँकर वेळेवर पोहोचत नसल्याच्या तक्रारी आहेत. काही गावांमध्ये आठवड्यातून एकदाच टँकर येत असल्याने दैनंदिन जीवन विस्कळित झाले आहे.
-----------------------------
पाड्यामध्ये पाणीटंचाई असल्याने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पंचायत समितीकडे टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची मागणी केली होती. त्यानंतर पाड्याला टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. पाच दिवसाला एक टँकर दिला जातो, त्यामुळे तहान भागवण्यासाठीची मोठी कसरत करावी लागत आहे.
- प्रकाश घाटाळ, हनुमान टेकडी, नाशेरा
-------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.