रायगडवासीयांना टोल माफ करावा!
तालुकाप्रमुख समीर म्हात्रे यांची मागणी
पेण, ता. ११ (वार्ताहर) : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अद्याप रखडलेल्या स्थितीत आहे. असे असताना पेण तालुक्यातील खारपाडा येथील टोलनाका सुरू करण्याचा घाट घातला जात आहे; मात्र प्रशासनाने सर्वप्रथम येथील सर्व सेवा रस्ते तत्काळ दुरुस्त करून रायगडवासीयांना टोल माफ करावा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे पेण तालुकाप्रमुख समीर म्हात्रे यांनी केली आहे.
कोकणातील एकमेव असणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला जवळपास १६ वर्षे होत आली असतानाही अनेक ठिकाणी महामार्गावर खड्डे पडले असून साइडपट्ट्याही भरलेल्या नाहीत, तर ओव्हर ब्रिजचेसुद्धा काम सुरू आहे. अशातच दरवर्षी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हा महामार्ग पूर्ण होण्याच्या डेडलाइन देत आहेत; परंतु आजतागायत मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण अवस्थेत तयार झालेला नाही. त्यातच पेण तालुक्यातील अनेक ठिकाणच्या सेवा रस्त्याची दुरवस्था झाली असून वाशी नाका ते वडखळ येथील सेवा रस्त्यावर टाकण्यात आलेल्या पेव्हर ब्लॉकचीसुद्धा दुरवस्था झाली असून या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असल्याने कोकणासह अलिबागकडे जाणाऱ्या वाहनांना याचा खूप मोठा त्रास सहन करावा लागत असताना येथे अनेकदा अपघात घडत आहेत. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सर्व सेवा रस्ते तत्काळ दुरुस्त करून रायगडवासीयांना टोल माफ करावा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.