नवी मुंबईत खोदकामांचा धडाका
नियोजनाचा अभाव; वाहनचालक, नागरिक त्रस्त
वाशी, ता. १२ (बातमीदार) ः नवी मुंबई महापालिका क्षेत्रात मॉन्सूनपूर्व कामांना वेग आला आहे. रस्ते काँक्रीटीकरण, जलवाहिन्या बदलणे आणि केबल टाकण्यासाठी विविध नोडमध्ये मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू आहे. मात्र, पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाही ही कामे अपूर्ण असल्याने शहरात वाहतूक कोंडी आणि अपघातांचे सत्र सुरू झाले आहे. यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केल आहे.
घणसोली, कोपरखैरणे, ऐरोली, तुर्भे, सानपाडा यांसह शहरातील विविध भागांत मोठ्या प्रमाणात रस्ते खोदण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी खोदकाम पूर्ण झाल्यानंतरही रस्त्यांची योग्य दुरुस्ती करण्यात आलेली नाही. खोदलेल्या ठिकाणी माती, खडी, दगड आणि बांधकाम साहित्य तसेच पडून असल्याने रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. विशेषत: दुचाकीस्वारांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. रस्त्यावर पडलेली खडी आणि मातीमुळे वाहनांचे किरकोळ अपघात घडत होत असून, जखमी झाल्याच्याही घटना समोर येत आहेत. रात्रीच्या वेळी अपुऱ्या प्रकाशव्यवस्थेमुळे आणि खोदकामाच्या ठिकाणी योग्य सूचनाफलक नसल्याने अपघातांचा धोका आणखी वाढत आहे. सकाळ आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत नागरिकांना वाहतूक कोंडीचाही मोठा सामना करावा लागत आहे. अनेक मुख्य रस्ते अर्धवट खोदलेले असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. दरम्यान, मॉन्सून काही दिवसांवर येऊन ठेपल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. पावसाळ्यात याठिकाणी पाणी साचण्याची शक्यता असून, त्यामुळे रस्ते अधिक धोकादायक बनू शकतात. खड्डे आणि चिखलामुळे मोठे अपघात होण्याची भीती वाहनचालक व्यक्त करत आहेत.
जीवाशी खेळ
विकासकामे होणे आवश्यक आहे, मात्र कामे करताना नियोजनाचा पूर्ण अभाव दिसून येतो. खोदकाम केल्यानंतर रस्ते आठवड्यानु आठवडे तसेच ठेवले जातात. यामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे, अशी प्रतिक्रिया वाहनचालकांनी दिली. नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत प्रशासनाने संबंधित कंत्राटदारांवर कठोर कारवाई करावी आणि अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करून रस्ते वाहतुकीसाठी सुरक्षित करावेत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.