सोने खरेदी टाळण्याच्या आवाहनाने सराफा बाजारात चिंता
मुंबईतील ५० हजार कारागिरांच्या रोजीरोटीचा प्रश्न
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : वर्षभरासाठी कोणीही सोने खरेदी करू नका, असे आवाहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर सराफा व्यापाऱ्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे. मुंबईत ज्वेलर्सची संख्या मोठ्या प्रमाणात असूनही या क्षेत्रात जवळपास ५० हजार कारागीर काम करतात. सोने खरेदी बंद किंवा कमी झाल्यास त्याचा थेट परिणाम या कामगारांच्या रोजीरोटीवर पडणार आहे.
आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वर्षभर सोने खरेदी न करण्याचे आवाहन केले. त्यानंतर सोन्याचा भाव घसरला आहे. सराफा व्यापाऱ्यांनी मात्र याबाबत चिंता व्यक्त केली आहे. मुंबईच्या सराफा बाजारात सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळत आहे. सध्या लग्नसराई आहे. तरीही दागिन्यांच्या दुकानात ग्राहकांची गर्दी कमी झाल्याचे चित्र आहे. पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन लोकांनी सोने खरेदी बंद केले, तर एक कोटी लोकांच्या रोजगारावर गंडांतर येईल. वर्षभर सोने विकले नाही तरीही सोन्याचे व्यापारी जगू शकतील. मात्र, कारागिरांनी कसे जगायचे, असा सवाल सराफा व्यापाऱ्यांचा आहे.
देशात दरवर्षी शेकडो टन सोन्याची खरेदी केली जाते. लोक सण, उत्सव, लग्न आणि गुंतवणुकीसाठी मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करतात. भारत आपल्या सोन्याच्या गरजेपैकी बहुतांश गरज परदेशातून आयात करतो. यामुळेच, जेव्हा जेव्हा सोन्याची आयात वाढते, तेव्हा मोठ्या प्रमाणात परकी चलन देशाबाहेर जाते. त्यामुळे पंतप्रधानांनी असे आवाहन केले आहे.
फारसा फरक पडणार नाही
सोने खरेदी न करण्याच्या पंतप्रधानांच्या आवाहनामुळे लोक खरेदी बंद करतील, असे वाटत नाही, असे पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष सौरभ गाडगीळ यांनी सांगितले. कारण दागिने ही आपली संस्कृती आहे. फार तर लोक जुने सोन्याचे दागिने मोडून नवे करतील, पण व्यवहार थांबणार नाहीत. कारण सोन्यात गुंतवणूक करा, असे हल्ली सर्वच वित्त सल्लागार सांगत आहेत. त्यामुळे ज्यांच्याकडे पैसा आहे, ते लोक सोने घेतीलच.
लग्नसराई असल्याने सोने ही गरजेची वस्तू आहे. त्यामुळे लोक सोने खरेदी बंद करण्याऐवजी कमी प्रमाणात खरेदी करतील. विशेषतः गुंतवणूक म्हणून खरेदी केले जाणारे सोने यामध्ये परिणाम होऊ शकते, पण लग्नाच्या सोने खरेदी करतीलच.
- अशोक रांका, ज्वेलर्स
कोणाची रोजीरोटी जायला नको
मुंबईत दागिन्यांच्या घडणावळीचे काम करणारे ५० हजार कारागीर आहेत. ते काम कुठे करणार. देशभक्त आम्ही पण आहोत, पण कोणाची रोजीरोटी जायला नको, अशी प्रतिक्रिया ऑल इंडिया ज्वेलर्स असोशिएशनचे प्रवक्ते कुमार जैन यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.