मुंबई

गड्या...गावाक जाऊक एसटीच बरी...

CD

गड्या...गावाक जाऊक एसटीच बरी...
खासगी ट्रॅव्हल्सच्या लुटीला कंटाळून कोकणवासीयांची लालपरीला पसंती
जीवन तांबे ः सकाळ वृत्तसेवा
मंबई, ता. १२ ः उन्हाळी सुट्ट्या, लग्नसराई, घरगुती पूजा, जत्रा आणि मामाच्या गावाला जाण्याची ओढ, यामुळे सध्या मुंबईतून कोकणाकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. दुसरीकडे खासगी लक्झरी बसचालक मनमानी पद्धतीने भाडे आकारत असल्यामुळे बहुतांश प्रवाशांनी एसटी बसला मोठी पसंती दिल्याचे चित्र आहे.
सुट्ट्या आल्यामुळे मुंबईत राहणाऱ्या कोकणवासीय आपल्या गावाकडे निघाले आहेत. खासगी लक्झरी बसमध्ये एका तिकिटासाठी तब्बल १,२०० ते २,००० तर स्लीपर, वातानुकूलित ३,५०० ते ४,००० एवढे दर आकारले जात आहेत. बहुतेक सामान्य कोकणवासीयांसाठी हे दर परवडणारे नसल्याने अनेकांनी पर्याय म्हणून एसटी महामंडळाच्या लालपरी, शिवशाही आणि स्लीपर बसकडे मोर्चा वळवला आहे. एसटीच्या तिकीटदरात सुमारे १० टक्के भाडेवाढ आणि प्रत्येक तिकिटामध्ये दोन रुपये स्वच्छता अधिभार जास्ती आकारले जात असले तरी ती खासगी बसच्या तुलनेत खूपच परवडणारी असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.
सध्या शाळा व महाविद्यालयांच्या सुट्ट्या संपत आल्याने अनेक कुटुंबे घाईघाईने गावाकडे रवाना होत आहेत. मुंबई सेंट्रल, परळ, पनवेल, ठाणे आणि बोरिवली येथील एसटी स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. अनेक मार्गांवरील बसगाड्या ‘हाउसफुल’ धावत असून, अतिरिक्त बस सोडण्याची वेळ एसटी प्रशासनावर आली आहे. लालपरीसोबतच शिवशाही आणि स्लीपर कोच बसलाही मोठी मागणी वाढली आहे. एकीकडे खासगी वाहतूकदारांचे वाढते दर आणि दुसरीकडे एसटीच्या सवलतीच्या योजना यामुळे सध्या लालपरीला अक्षरशः अच्छे दिन आल्याचे चित्र आहे.

खासगी लक्झरी बसचे दराच्या तुलनेत एसटीचा प्रवास सुरक्षित आणि परवडणारा आहे. त्यातच मला मोफत प्रवास असल्याने आम्ही कुटुंबासह लालपरीने गावाकडे निघालो आहोत.
– चंद्रकांत तांबे, ज्येष्ठ नागरिक

महिलांना अर्धे तिकीट आणि ज्येष्ठांना मोफत प्रवास असल्याने आमचा मोठा खर्च वाचतो. त्यामुळे एसटी हाच सर्वात चांगला पर्याय वाटतो.
– राजेश्री कदम, प्रवासी महिला

मुलांचे क्लासेस सुरू होण्यापूर्वी गावाला जाऊन येण्यासाठी एसटीच सोयीची ठरली आहे. खासगी बसवाल्यांचा मनमानी दर आम्हाला परवडत नाही.
– विलास धोत्रे, प्रवासी

Gold Crisis Explainer: १.४ अब्ज भारतीयांना १ वर्ष सोने खरेदी टाळण्याचे आवाहन भारताची अर्थव्यवस्था बदलू शकते का?

SSC HSC Supplementary Exam : दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा १६ जूनपासून; राज्य मंडळातर्फे परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

Latest Marathi News Live Update : CBI चं पथक नाशिकमध्ये दाखल; नीट प्रकरणातील संशयित आरोपी शुभम खैरनारचा घेणार ताबा

Dattatreya Hosabale : 'भारताने पाकिस्तानशी संवादाची दारे पूर्णपणे बंद करू नयेत'; RSS सरचिटणीसांचं मोठं विधान, हिंदूराष्ट्राबाबतही केलं भाष्य

पंतप्रधानांच्या इंधन बचतीच्या आवाहनचे पडसाद! जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावरून प्रवास; मोर्चा काढत केंद्र सरकारवर टीका

SCROLL FOR NEXT