जुन्या गणवेशात भरणार शाळेचा पहिला दिवस
नवी मुंबई महापालिकेची जुन्या कंत्राटदाराला मुदतवाढ
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १२ : नवी मुंबई महापालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांना गणवेशपुरवठा करण्यासाठी पुन्हा जुन्या कंत्राटदाराला मुदतवाढ देण्यात आली आहे. महापालिका प्रशासनातर्फे उशिराने केलेल्या प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांना यंदा जुन्या गणवेशातच शाळेत जावे लागणार आहे. मंगळवारी (ता. १२) स्थायी समितीसमोर गणवेशपुरवठा करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्याला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. मात्र, येत्या १४ जूनला शाळा सुरू होणार असल्याने त्यानंतर कंत्राटदारामार्फत पुरवठा होणार आहे.
महिला बचत गटांमार्फत गणवेश तयार करून पुरवठा करण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत शिक्षण विभागातर्फे सादर करण्यात आला होता. मात्र, या प्रस्तावाला सदस्यांनी विरोध केला. तसेच, विद्यार्थ्यांना वेळेवर गणवेश उपलब्ध होणार नाही ही बाब लक्षात घेऊन जुन्या कंत्राटदाराच्या कामाला मुदतवाढ देण्याचे आदेश महापौर सुजाता पाटील यांनी शिक्षण विभागाला दिले होते. त्यानुसार स्थायी समितीच्या पटलावर विद्यार्थ्यांना गणवेशपुरवठा करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला. या प्रस्तावाला प्रशासनाने मंजुरी दिली. मात्र, कंत्राटदाराला अद्याप कार्यादेश देण्यासाठी काही दिवस जाणार आहे. त्यानंतर गणवेशाच्या कामाला सुरुवात होणार आहे. तोपर्यंत जुलै महिना उलटून जाईल. त्यामुळे महापालिकेच्या विद्यार्थ्यांना यंदाच्या वर्षीही पहिल्या दिवशी जुन्या गणवेशात जावे लागणार आहे.
महिला बचत गटांचे गणवेश पुढच्या वर्षी
नवी मुंबई आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिलेल्या आदेशानुसार ११६ महिला बचत गटांची गणवेश तयार करण्यासाठी निवड करण्यात आली होती. बचत गटामार्फत शालेय गणवेश, पी. टी. व स्काऊट गाईड गणवेश तयार करण्याचे काम देण्यात येणार आहे. मात्र, कापड पुरवणे यात विलंब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी जुन्या कंत्राटदाराला गणवेशपुरवठा करण्याचे काम देण्यात येणार आहे.
१३ कोटींची तरतूद
महापालिकेतर्फे मफतलाल इंड्स्ट्रीज लिमिटेड हे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ या एक वर्षासाठी नवी मुंबई महापालिकेतर्फे बालवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी गणवेशपुरवठा करणार आहेत. पाच टक्के पटसंख्येत वाढ लक्षात घेत गेल्या वेळच्या दरात १० टक्के वाढ सूचवण्यात आली आहे. त्यानुसार ५० हजार ५५८ विद्यार्थ्यांना गणवेशाकरिता १३ कोटी ३३ लाख ३० हजार २५५ रुपयांचा खर्चाची तरतूद स्थायी समितीने केली आहे.
महापालिका शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षी वेळेत गणवेश उपलब्ध व्हावेत याकरिता प्रशासनासहित सर्व लोकप्रतिनिधी आग्रही आहेत, परंतु यंदाच्या वर्षी प्रशासनाकडून गणवेशपुरवठा करण्याच्या प्रक्रियेला उशीर झाला. मात्र, पुढच्या वर्षी विद्यार्थ्यांना वेळेवर गणवेश मिळेल याची दक्षता आम्ही घेऊ.
- अशोक पाटील, स्थायी समिती, सभापती, नवी मुंबई महापालिका