किनारपट्टीवरील शेती संकटात
चार वर्षांपासून ७५ कोटींचा प्रस्ताव प्रलंबित; खारबंदिस्ती रखडल्याने भातशेती आणि मत्स्यव्यवसाय धोक्यात
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १२ ः रायगड जिल्ह्यातील किनारपट्टी भागातील खारबंदिस्तीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून नादुरुस्त संरक्षणात्मक बंधाऱ्यांमुळे शेतकरी आणि मत्स्य व्यावसायिकांपुढे मोठे संकट उभे राहिले आहे. दरवर्षी पावसाळ्यात समुद्राच्या उधाणामुळे किनारपट्टीलगतचे बंधारे कमजोर होत असतानाही त्यांच्या दुरुस्तीसाठी पाठविण्यात आलेला ७५ कोटी ८६ लाख रुपयांचा प्रस्ताव मागील चार वर्षांपासून आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे प्रलंबित आहे. त्यामुळे येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
मुरूड, श्रीवर्धन तसेच अलिबाग तालुक्यातील समुद्रकिनारी भागांमध्ये उधाणाच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात धूप झाली आहे. धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांसाठी जिल्हा नियोजन मंडळाकडे निधीची मागणी करण्यात आली होती; मात्र सीआरझेडच्या नियमांमुळे मंजुरी प्रक्रियेला विलंब झाला. मंजुरी मिळाल्यानंतरही निधी उपलब्ध न झाल्याने प्रत्यक्ष कामांना सुरुवात होऊ शकलेली नाही. रायगड जिल्ह्यातील खारभूमी भागात भात, नारळ आणि मत्स्यशेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. ही जमीन उच्चतम भरती रेषेपेक्षा सुमारे दोन मीटर खाली असल्याने समुद्राच्या उधाणावेळी खारे पाणी थेट शेतांमध्ये शिरते. त्यामुळे जमीन नापीक होण्याचा धोका वाढला असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. खारभूमी विभागाने उभारलेल्या बांधांची दरवर्षी डागडुजी करणे आवश्यक असते. पूर्वी ग्रामस्थ लोकसहभागातून ही कामे करीत होते; मात्र सध्या शासकीय मदत वेळेत मिळत नसल्याने दुरुस्तीची कामे रखडली आहेत. काळ्या मातीचे आणि गाळयुक्त बांध पावसामुळे लगेच वाहून जातात. विशेषतः ऑगस्ट ते ऑक्टोबरदरम्यान अनेक ठिकाणी संरक्षक बांध फुटतात. त्याच काळात भातपिकाची गर्भावस्था असल्याने खारे पाणी शिरल्यास दाणा भरत नाही आणि उत्पादनावर गंभीर परिणाम होतो.
-----
खारभूमीचे सर्वाधिक क्षेत्र रायगडमध्ये
कोकणात ३२ हजार ५१४ हेक्टर एवढे खारभूमी क्षेत्र आहे. यातील २२ हजार ५५९ हेक्टर क्षेत्र रायगड जिल्ह्यात आहे. या क्षेत्रासाठी खारलॅण्ड विभागाने १६५ सरकारी बंदिस्ती योजना आखल्या आहेत; पण या योजना राबविण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध होत नसल्याची ओरड वेळोवेळी केली जाते आहे. खारबंदिस्ती फुटल्याने शेतात खारे पाणी शिरते. यामुळे शेतीचे नुकसान होते. या योजनांसाठी आतापर्यंत करोडो रुपये खर्च करण्यात आले; मात्र त्यापासून शेतकऱ्यांना कोणताही लाभ मिळत नसल्याचे दिसून येत आहे.
----
दुरुस्तीचा प्रस्ताव पाठवण्यात आलेले खार प्रतिबंध बंधारे
बंधाऱ्याचे नाव/ बंधाऱ्याची लांबी (मीटर)/ एकूण रक्कम
पेण-कणे कोप्रोली / ५०२१ / ८.८६
पेण-ओवळी / १७४६ / १.४३
पेण-दुतर्फा कोपर / ३९११ / १.३१
पेण-तळेखार / १४०० / ४.९१
पेण-कोकेरी /३५०० / ०.९५
पेण-शिर्की वाशी / २०० / ३.५७
अलिबाग-कोपरी चिखली / २१०० / ७.०२
अलिबाग-भोणंग / ४०४० / ८.८७
अलिबाग-वरसगाव / ३१४० / ११.९८
मुरूड-सोनखार जाफर / ४५९० / १०.५८
रोहा-दिवखार / १४५०० / ७.८८
म्हसळा-खरसई / १५२० / ०.९९
म्हसळा-तोंडरुसे खारगाव / २०० / १.६९
म्हसळा-काळसुरी / १४०० / १.६९
-----------------
एकूण- ७५ कोटी ८६ लाख रुपये
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.