तुर्भे बस डेपोत थरार!
चालकाच्या निष्काळजीमुळे बस पलटी
नवी मुंबई, ता. १२ (वार्ताहर) : तुर्भे येथील नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाच्या (एनएमएमटी) बस डेपोमध्ये बस पलटी झाल्याची घटना सोमवारी (ता. ११) मध्यरात्री घडली. एका कंत्राटी बसचालकाच्या निष्काळजीमुळे डेपोमध्ये उभ्या असलेल्या दोन बसना धडक देऊन ही बस उलटली. तिन्ही बसचे या अपघातात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, प्रशासनाने संबंधित चालकाला तातडीने सेवेतून निलंबित केले आहे.
तुर्भे डेपोमध्ये सोमवारी (ता. ११) रात्री १२च्या सुमारास चार्जिंग पूर्ण झालेल्या बस पार्किंगमध्ये लावण्याचे काम सुरू होते. या वेळी एक कंत्राटी चालक चार्जिंग झालेली बस पार्किंगच्या दिशेने घेऊन जात होता. मात्र, बस चालवत असताना त्याचे वेगावर नियंत्रण नव्हते. भरधाव वेगातील या बसवरील ताबा सुटल्याने ती डेपोत आधीच उभ्या असलेल्या अन्य दोन बसला जाऊन जोरदार धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, धडक दिल्यानंतर बस जागीच पलटी झाली.
या अपघातात सुदैवाने चालक किरकोळ जखमी झाला असून, मोठी जीवितहानी टळली आहे. मात्र, एनएमएमटीच्या मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले आहे. पलटी झालेली बस आणि ज्या दोन बसना धडक बसली, अशा तिन्ही गाड्यांचे दर्शनी भाग आणि इंजिनचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे डेपो परिसरातील कर्मचाऱ्यांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते. एनएमएमटी प्रशासनाने या घटनेची अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. डेपोसारख्या सुरक्षित ठिकाणी बस इतक्या वेगाने चालवणे ही गंभीर निष्काळजी असल्याचे ताशेरे ओढत, प्रशासनाने संबंधित कंत्राटी चालकाला तातडीने सेवेतून निलंबित केले आहे. ‘सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही,’ असा इशारा एनएमएमटीकडून देण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.