अतिक्रमणावरून संघर्ष पेटला
सर्वपक्षीय नेते, ग्रामस्थ आक्रमक; कठोर कारवाईची मागणी
बोईसर, ता. १३ (बातमीदार) : बोईसरमधील मुख्य रस्ते, फुटपाथ आणि सार्वजनिक जागांवर वाढलेल्या बेकायदा हातगाड्या, फेरीवाले आणि टपऱ्यांविरोधात ग्रामपंचायतीने सुरू केलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेला आता संघर्षाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. कारवाईदरम्यान निर्माण झालेल्या तणावानंतर सर्वपक्षीय नेते, ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक आणि व्यावसायिक आक्रमक झाले असून, त्यांनी थेट पालघर पोलिस अधीक्षक कार्यालय गाठत कठोर आणि निर्णायक कारवाईची मागणी केली आहे.
बोईसर ग्रामपंचायत यांनी पोलिस प्रशासनाला दिलेल्या निवेदनात वाढत्या अतिक्रमणांमुळे मुख्य रस्ते अक्षरशः गुदमरल्याची गंभीर बाब मांडली आहे. औद्योगिक शहर म्हणून झपाट्याने विस्तारत असलेल्या बोईसरमध्ये दररोज हजारो कामगार आणि प्रवाशांची वर्दळ असते. मात्र, फुटपाथवरच व्यवसाय थाटल्याने पादचारी नागरिकांचा जीव धोक्यात आल्याचा आरोप ग्रामपंचायतीने केला आहे.
११ मे रोजी ग्रामपंचायतीने राबविलेल्या तोडक कारवाईदरम्यान ओस्तवाल सोसायटीसमोर काही महिलांनी कारवाईत अडथळा आणल्याचा आरोप करण्यात आला आहे. या वेळी ग्रामपंचायतीच्या विद्युत वायर तोडण्यात आल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले असून, संबंधितांवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
-------------------
कारवाईसाठी बंदोबस्त देणार
दरम्यान, बोईसरमधील अनधिकृत अतिक्रमण पूर्णपणे हटविल्याशिवाय माघार घेणार नाही, असा ठाम इशारा सर्वपक्षीय नेत्यांनी दिला आहे. मुख्य रस्त्यालगत उभ्या असलेल्या अनधिकृत दुकानांवर आणि टपऱ्यांवर लवकरच मोठ्या प्रमाणावर बुलडोझर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी पोलिस अधिक्षक सतीश देशमुख यांनी, सदर प्रकरणाची चौकशी करून संबंधित यंत्रणांच्या संयुक्त सहभागातून तोडगा काढण्यात येईल. त्यानंतर आवश्यकतेनुसार पुढील तोडक कारवाईसाठी मोठा पोलिस बंदोबस्त देण्यात येईल, असे स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.