कडक उन्हाच्या झळांनी मातीच्या माठांना ‘अच्छे दिन’
फ्रीजपेक्षा पारंपरिक गारव्याला पसंती
जीवन तांबे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ ः कडक उन्हाळा आणि दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अशा परिस्थितीत फ्रीजच्या अतिथंड पाण्यापेक्षा नैसर्गिकरित्या गार राहणाऱ्या पारंपरिक मातीच्या माठांना पुन्हा मोठी मागणी वाढल्याने यंदा माठविक्रेत्यांना यंदाच्या उन्हाळ्यात चांगले दिवस आले आहेत.
एकेकाळी प्रत्येक घराचा अविभाज्य भाग असलेले माठांची आता शहरांमध्येही विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. अनेक जण फ्रीजमधील अतिथंड पाण्याऐवजी माठातील नैसर्गिक थंड पाण्याला पसंती देताना दिसत आहेत.
माठातील पाणी शरीरासाठी अधिक हितकारक मानले जाते. फ्रीजमधील अतिथंड पाण्यामुळे घसा बसणे, सर्दी किंवा पोटाचे विकार होण्याची शक्यता असते. त्याउलट माठातील पाणी नैसर्गिक पद्धतीने थंड होत असल्याने शरीराचे तापमान संतुलित राहण्यास मदत होते. याच कारणामुळे “गरिबांचा फ्रीज” म्हणून ओळखले जाणारे माठ आजही सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाचा पर्याय ठरत आहेत.
मुंबईसह काही भागांत पारंपरिक कुंभारकाम कमी होत चालल्याने गुजरातमधून मोठ्या प्रमाणात माठ आणले जात आहेत.
किमती वाढल्या
यंदा माठांच्या किमतीतही वाढ झाल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. माती, भुसा, कोळसा, मजुरी आणि वाहतूक खर्च वाढल्यामुळे माठांच्या दरात २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या बाजारात मोठे नळ असलेले काळे माठ १,२०० ते १,५०० रुपये, तर लाल रंगाचे आकर्षक माठ १,३०० रुपयांपर्यंत विकले जात आहेत. लहान माठांची किंमत ५०० ते ६०० रुपयांपर्यंत आहे.
मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदा विक्री चांगली वाढली आहे. मात्र, माती आणि वाहतूक खर्च वाढल्याने दर वाढवावे लागले.
- संजय सोळंकी, माठविक्रेता, माटुंगा
माठातील पाणी नैसर्गिकरीत्या गार असते आणि चवही वेगळी लागते. त्यामुळे आम्ही दरवर्षी उन्हाळ्यात माठ वापरतो.
- सुवर्णा कदम, गृहिणी
उन्हाळ्यामध्ये शरीरातील पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होत असते. अशावेळी अतिथंड पाणी पिण्यापेक्षा माठातील थंड पाणी आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरते. माठातील पाणी शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यास मदत करते. तसेच घसा दुखणे, सर्दी, खोकला किंवा पोटाचे विकार होण्याची शक्यता कमी होते. त्यामुळे शक्यतो उन्हाळ्यात माठातील पाण्याचा वापर करावा.
- डॉ. महादेव गारळे, शल्यचिकित्सक केईएम रुग्णालय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.