पंकज रोडेकर : सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १३ : ‘कानून के हाथ लंबे होते हैं’ ही म्हण पुन्हा एकदा खरी ठरवत ठाणे ग्रामीण पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. गेल्या तीन वर्षांतील खुनाच्या घटनांची आकडेवारी पाहिली असता, दाखल झालेल्या जवळपास सर्वच गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. ग्रामीण पोलिसांची शंभर नंबरी कामगिरी असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २०२४ मध्ये ठाणे ग्रामीण हद्दीत खुनाचे ३१ गुन्हे दाखल झाले होते. यापैकी ३० गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर २०२५ मध्ये खुनाचे २९ गुन्हे दाखल झाले आणि विशेष म्हणजे, ते सर्व २९ गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले. तर चालू वर्ष २०२६ मध्ये आतापर्यंत खुनाचे पाच गुन्हे दाखल झाले असून, त्या पाचही गुन्ह्यांची उकल करण्यात ठाणे ग्रामीण पोलिसांना तत्कालीन ठाणे ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांच्या नेतृत्वाखाली यश आल्याचे स्पष्ट दिसत आहे.
खुनासारख्या गंभीर गुन्ह्यांचा तपास करताना आधुनिक तंत्रज्ञान, सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीदारांच्या मदतीने आरोपींपर्यंत पोहोचण्यात यश येत असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. गुन्हेगार कितीही चलाखीने गुन्हा करून पळण्याचा प्रयत्न करत असले तरी कायद्याच्या कचाट्यातून सुटका नाही, हे ठाणे ग्रामीण पोलिसांच्या या कामगिरीतून पुन्हा स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नागरिकांमध्येही सुरक्षिततेची भावना अधिक बळकट झाल्याचे बोलले जात आहे.
भातसा नदीपात्रातील खून प्रकरणाचा उलगडा
कल्याण तालुक्यातील ज्यूगाव येथील भातसा नदीपात्रात आढळलेल्या अनोळखी मृतदेह प्रकरणाचा अवघ्या काही दिवसांत उलगडा केला. याप्रकरणी एका मित्राची हत्या करणाऱ्या दुसऱ्या मित्राला मुंबईतून अटक केली. २१ एप्रिलला मृतदेह आढळल्यानंतर श्वानपथक, तांत्रिक तपास आणि १०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास झाला. पैशांच्या वादातून मित्रानेच मित्राची दगडाने ठेचून हत्या केल्याचे उघडकीस आणण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले.
वृद्धाच्या ओळखीबरोबर मारेकरी जेरबंद
मुरबाड तालुक्यातील उदालडोह गावाजवळ अहमदनगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर आढळलेल्या ६० वर्षीय वृद्धाच्या हत्येचा उलगडा करण्यात यश आले आहे. याप्रकरणी मृत व्यक्तीच्या दुसऱ्या पत्नीसह दोन सावत्र मुलांना अटक करण्यात आली आहे. ६ ऑक्टोबर २०२५ रोजी मुरबाडमधील उदालडोह येथे वृद्धाचा मृतदेह आढळला होता. तांत्रिक तपासातून मृताची ओळख पटली. शिवाय, नशेमुळे कुटुंबाला तो त्रास देत असल्याने गळा आवळून त्याची हत्या केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.
वर्ष गुन्हे दाखल उलगडा
२०२४ ३१ ३०
२०२५ २९ २९
२०२६ ०५ ०५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.