आरटीई प्रवेशासाठी २९ बनावट दाखले
मिरा-भाईंदर पालिकेच्या शिक्षण विभागाकडून भांडाफोड
भाईंदर, ता. १३ (बातमीदार) : शिक्षणाचा हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) शाळा प्रवेशासाठी अडीच ते तीन हजारांच्या मोबदल्यात उत्पन्नाचे २९ बनावट दाखले दिल्याचा प्रकार मिरा रोड येथे उघडकीस आला आहे. मिरा-भाईंदर पालिकेच्या शिक्षण विभागाच्या पडताळणीत हा गैरप्रकार उघड झाला आहे.
गरीब व वंचित घटकातील मुलांना खासगी शाळांमध्ये मोफत शिक्षण मिळावे, यासाठी शिक्षणाचा हक्क कायदा लागू करण्यात आला आहे. खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव असतात. मिरा-भाईंदर महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून आरटीई प्रवेशासाठी पालकांकडून अर्ज मागविण्यात आले होते. मिरा-भाईंदरमधील एकंदर २९८ जागांसाठी ऑनलाइन पद्धतीने ६७६ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी २९८ अर्जांची अंतिम निवड झाली होती. या अर्जांसोबत सादर झालेल्या कागदपत्रांची शिक्षण विभागाने पडताळणीत २९ अर्जांसोबत बनावट दाखले जोडल्याचे आढळून आले आहेत. त्यामुळे बनावट दाखले तयार करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेतला जात आहे.
-------------------------------------
मुलांचे भवितव्य टांगणीला
मिरा रोड येथे सर्व दाखले बनवण्यात आले आहेत. तसेच पालकांकडून प्रत्येकी २,५०० ते ३,००० रुपये घेतले आहेत. महत्त्वाचे म्हणजे, फसवणूक झालेले बहुतांश पालक मिरा रोडच्या नयानगर भागातील असून आर्थिक दुर्बल घटकातील आहेत. तसेच सर्व अर्ज नाकारल्याने मुले शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
------------------
पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष
भाईंदर येथील अतिरिक्त तहसीलदार कार्यालयात तक्रार दाखल केली गेली होती. त्यानंतर अतिरिक्त तहसीलदार कार्यालयाने दाखल्यांची पडताळणी केली. त्या वेळी दाखल्यावर स्वाक्षरी असलेले नायब तहसीलदार प्रत्यक्षात अस्तित्वातच नसल्याचे आढळून आले. तसा अहवाल नयानगर पोलिसांकडे पाठवला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.