नवी मुंबईवर पाणीकपातीचे सावट
मोरबे धरणात ८ ऑगस्टपर्यंत पुरेल इतकेच पाणी
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १३ : अल निनोच्या प्रभावामुळे मॉन्सून लांबणीवर पडल्यास नवी मुंबई महापालिकेला पाणीकपातीचा निर्णय घ्यावा लागणार आहे. महापालिकेच्या मालकीच्या मोरबे धरणात ऑगस्टपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. मात्र, धरणातून रोज होणारा पाणी उपसा आणि नवी मुंबई व्यतिरिक्त इतर शहरांना दिले जाणारा पाणीपुरवठा पाहता, काटसकरीच्या दिशेने पाऊल उचलावे लागणार, असे चिन्ह निर्माण झाले आहे.
मोरबे धरण पूर्ण भरण्यासाठी साधारणपणे ३,५०० मिमी पावसाची आवश्यकता असते. मात्र, सद्यःस्थितीत धरणाची पातळी खूपच खाली गेल्यामुळे यावर्षी धरण ओसंडून वाहण्यासाठी किमान ३,६०० मिमी पावसाची गरज भासणार आहे. हवामान खात्याने यावर्षीचा पाऊस सरासरीच्या ९२ ते ९४ टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. जर पाऊस ९२ टक्के (सुमारे ३,३२७ मिमी) राहिला, तर मोरबे धरण १०० टक्के भरण्याची शक्यता कमी आहे. एप्रिलअखेर आणि मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यातील आकडेवारीनुसार, मोरबे धरणातील साठा पुढील ७७ ते ८५ दिवस पुरेल इतकाच शिल्लक आहे. पाणीसाठ्याचे वर्गीकरण समजून घेणे तांत्रिकदृष्ट्या आवश्यक आहे. एकूण साठा आणि वापरण्यायोग्य साठा यामध्ये फरक असतो.
एक महिन्याचा साठा हा ‘इमर्जन्सी रिझर्व्ह’
पालिकेच्या धोरणानुसार, एक महिन्याचा साठा हा ‘इमर्जन्सी रिझर्व्ह’ म्हणून ठेवला जातो. हा राखीव साठा वजा केला, तर प्रत्यक्ष वापरासाठी उपलब्ध असलेले पाणी शहराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मर्यादित काळासाठीच उपलब्ध आहे. सद्यःस्थितीतील उपसा दर ४७६.८५ एमएलडी पाहता, पावसाळा १० ते १५ जूनच्या दरम्यान सक्रिय झाला नाही, तर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत नवी मुंबईला अत्यंत तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.
मोरबे धरणाची स्थिती
घटक माहिती
सध्याचा साठा ३७.८५%
३० एप्रिल साठा ४३.२४%
उपलब्ध पाणी ७७-८५ दिवस
रोजचा उपसा ४७६.८५ एमएलडी
गंभीर कालावधी ऑगस्ट पहिला आठवडा
धरण पूर्ण भरण्यासाठी आवश्यक पाऊस ३,६०० मिमी
मागील वर्षांची तुलना
वर्ष पाऊस
२०२१ २२६.८० मिमी
२०२३ ३,५४९ मिमी
२०२६ अंदाज ३,३२७ मिमी
अवघ्या नऊ दिवसांत मोठी घट
३० एप्रिल रोजी धरणात ४३.२४% साठा होता, जो ९ मेपर्यंत घसरून ३७.८५% वर आला आहे. म्हणजेच अवघ्या नऊ दिवसांत साठ्यात मोठी घसरण झाली आहे.
पनवेलला अतिरिक्त पाणी देणार नाही
१ पनवेल आणि त्यालगतच्या खारघर, तळोजा, कळंबोली भागात पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांनी एनएमएमसी मुख्यालयावर धडक देऊन मोरबे वाहिनीतून अतिरिक्त २० ते ३० एमएलडी पाण्याची मागणी केली आहे. नवी मुंबईला जाणारी जलवाहिनी कळंबोली सर्कल येथून जाते. जर त्यांच्या भागाला पाणी मिळाले नाही, तर ते नवी मुंबईला जाणारा मुख्य व्हॉल्व्ह बंद करतील, असा इशारा पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनी दिला आहे.
२ महापालिकेने ही मागणी मान्य करणे तांत्रिकदृष्ट्या कठीण आहे. मोरबे धरणातील स्वतःचा साठा ४० टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे. पावसाचा कोणताही भरवसा नाही. कोणत्याही अतिरिक्त वाटपामुळे स्वतःच्या शहरातील नागरिकांवर अन्याय होईल, अशी भूमिका प्रशासनाने घेतली आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत पनवेलला अतिरिक्त पाणीपुरवठा केला जाणार नाही, असे स्पष्टीकरण नवी मुंबई महापालिकेचे सहशहर अभियंते अरविंद शिंदे यांनी दिले आहे.