उष्णतेच्या लाटेचा वाढता धोका
प्रशासन अलर्ट मोडवर; आरोग्य सुरक्षेसाठी विशेष सूचना
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १३ : राज्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर उष्णतेच्या लाटेचा धोका अधिक तीव्र होण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य शासनाने सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांना सतर्कतेच्या सूचना जारी केल्या आहेत. नागरिकांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी विविध विभागांना तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
रायगड जिल्ह्यातील तापमान मागील काही दिवसांपासून सरासरी ३५ अंशाच्या वर असल्यामुळे रायगडमधील जनजीवन विस्कळित झाले आहे. महसूल व वन विभागांतर्गत आपत्ती व्यवस्थापन विभागाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तसेच हवामान बदल आणि मानवी आरोग्यावरील राष्ट्रीय कार्यक्रम यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही कार्यवाही सुरू केली आहे. उष्णतेच्या लाटेमुळे उष्माघात, निर्जलीकरण आणि इतर आरोग्यविषयक समस्या निर्माण होण्याचा धोका वाढत असल्याने प्रशासनाने आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
नगरपालिका, पंचायत, आरोग्य, शिक्षण, कामगार, परिवहन, कृषी, पोलिस, ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम, महिला व बालविकास विभाग तसेच एमआयडीसी प्रशासनाला आपापल्या स्तरावर आवश्यक उपाययोजना करण्यास सांगण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सावलीसाठी तात्पुरते निवारे, सुविधा, प्रथमोपचार केंद्रे तसेच जनजागृती फलक उभारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
---
चौकट
मैदानी कामात बदल करण्याच्या सूचना
आरोग्य विभागाने जिल्हा रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघातग्रस्त रुग्णांसाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध ठेवण्यास सांगितले आहे. जलद प्रतिसाद पथके सज्ज ठेवण्याबरोबरच ओआरएस आणि आवश्यक औषधांचा पुरेसा साठा राखण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कामगार विभागाने बांधकाम व मैदानी कामांच्या वेळांमध्ये बदल करून कामगारांना थंड पाणी आणि विश्रांतीची सुविधा देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
----
चौकट
महिला व बालविभागाची जनजागृती
महिला व बालविकास विभागामार्फत अंगणवाडी सेविका आणि आशा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जनजागृती मोहीम राबविण्यात येणार असून, गर्भवती महिला, लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींकडे विशेष लक्ष देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
----
नागरिकांनी दुपारी १२ ते ३ या वेळेत बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी व द्रवपदार्थांचे सेवन करावे, हलक्या रंगाचे सैल कपडे वापरावेत आणि भारतीय हवामान विभागाच्या सूचनांकडे लक्ष ठेवावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
- सागर पाठक, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.