रखरखत्या उन्हात विजेचा लपंडाव
तब्बल १४ तास जव्हारकर घामाघूम
जव्हार, ता. १३ (बातमीदार) : महाराष्ट्रात उन्हाचा पारा भयंकर वाढला आहे. अशात ग्रामीण भागातील विजेचा लपंडाव काही कमी होत नाही. उष्णता एवढी वाढली आहे की, पंख्याशिवाय घरात बसणे कठीण झाले आहे. अशात मुंबई, ठाण्यासारख्या शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जव्हार, मोखाड्यात अद्याप २४ तास सलग वीजपुरठा मिळेल, अशी व्यवस्था नाही. मंगळवारी (ता. १२) तर तब्बल १४ तास येथील वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांच्या अंगाची लाही लाही झाली होती.
येथे मंगळवारी ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यात पहाटे ४ वाजता जी वीज गायब झाली ती सायंकाळी ६ वाजेपर्यंतही न आल्याने नागरिक उकाड्याने हैरान झाले होते. छोटे-मोठे उद्योग धंदे, आईस्क्रीमची दुकाने याशिवाय लग्नसराईचे दिवस असल्याने त्यांना वीज नसल्याचा फटका बसला. लहान मुलांपासून ते रुग्ण व वयोवृद्धापर्यंत अनेकांसाठी मंगळवारचा दिवस अत्यंत वाईट असा गेला. पालघर जिल्ह्यात सध्या कुठेही पाऊस पडलेला नाही ना, वादळी वाऱ्याचा फटका येथे बसला. असे असतानाही डहाणूवरून होणारा वीजपुरवठा कासा, गंजाड, सूर्यानगर, जव्हार, मोखाडा आणि पर्यायाने खोडा येथे खंडित झाला होता. पहाटेच्या सुमारास गेलेली वीज नेमकी कोणत्या कारणाने गेली आहे, याचे नेमके कारण वीजग्राहकांना मिळाले नाही. फक्त १३३ केव्हीची तार जळाली असून, तिच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे सांगण्यात आले.
तसेच अनेक नागरिकांनी महावितरणच्या कार्यालयात संपर्क साधला असता त्यांना काही वेळातच तांत्रिक बिघाड दुरुस्त केला जाईल, हेच उत्तर मिळत होते. मुळात हा बिघाड का आला, असा प्रश्नही वीजग्राहकांच्या वतीने विचारण्यात आला. मात्र, त्याबाबत सविस्तर असे उत्तर मिळू शकले नाही. ज्यांच्या घरात इन्व्हर्टर होते, त्यांची क्षमताही संध्याकाळपर्यंत संपलेली.
----------
अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
या प्रकारात तब्बल १४ तास वीजपुरवठा खंडित झाल्याने यासाठी जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ती तार जळल्यानंतर तेथे दुसऱ्या सोई नव्हत्या का, असा प्रश्नही वीजग्राहकांनी उपस्थित केला. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी आता नागरिकांनी केली आहे. तसेच भविष्यात अशा प्रकारची एखादी घटना घडल्यास तेथे ताडतीने कारवाई व्हावा, अशी इच्छाही नागरिकांनी व्यक्त केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.