रानसई आदिवासीवाड्यांवर तीव्र पाणीटंचाई
टॅंकरने पाणीपुरवठा, कायमचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी आदिवासी बांधवांचे प्रशासनाला साकडे
उरण, ता. १३ (बातमीदार) ः उरण तालुक्यातील रानसई धरण क्षेत्राच्या डोंगरकुशीत वसलेल्या आदिवासीवाड्यांना सध्या भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. रानसई ग्रामपंचायत हद्दीतील सहा आणि चिरनेर ग्रामपंचायत हद्दीतील दोन अशा एकूण आठ आदिवासीवाड्यांमधील विहिरींनी तळ गाठल्याने आदिवासी बांधवांचे हाल होत आहेत. यामुळे धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती आदिवासी बांधवांची निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे, उरण तालुक्याला पाणीपुरवठा करणारे रानसई धरण ज्या ग्रामपंचायत हद्दीत आहे, त्याच हद्दीतील खैरकाटी, बंगल्याचीवाडी, सागाचीवाडी, मार्गाचीवाडी, खोंड्याचीवाडी आणि चिरनेर हद्दीतील चांदायणी व केळाचामाळ या वाड्यांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. रानसई व पुनाडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाणीपातळी खालावल्याने विहिरी आणि हफशी (हातपंप) कोरडे पडले आहेत. यात ज्येष्ठांपासून लहानग्यांनाही भरउन्हात पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. या भागात टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र, हा पाणीपुरवठा पुरेसा नसल्याने आदिवासी बांधवांना वणवण फिरावे लागत आहे, तर टँकरच्या प्रतीक्षेत आदिवासी बांधवांना तासनतास ताटकळत राहावे लागते. पाणी भरण्यातच संपूर्ण दिवस जात असल्याने या मजुरांना कामावर जाता येत नाही. यामुळे त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, तर अनेक गावांमधील रहिवाशांना गढूळ पाणीपुरवठा होत असल्याची ओरड रहिवाशांकडून ऐकण्यास मिळत आहे.
दिरंगाईमुळे योजना अर्धवट
१ आदिवासी बांधवांचा पाण्याचा कायमचा प्रश्न सोडविण्यासाठी जलजीवनच्या माध्यमातून तीन विहिरींची कामे शासनाने ठेकेदाराच्या माध्यमातून हाती घेतली आहेत. मात्र, ही कामे ठेकेदाराने अर्धवट ठेवली असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागातून देण्यात आली आहे.
२ चिरनेर केल्याचा माळ या आदिवासीवाडीला जलजीवन मिशनच्या माध्यमातून योजना तयार करून हेटवणे पाइपलाइनद्वारे पाणी देण्याचे टेंडर काढून ठेकेदारही नेमण्यात आले होते. मात्र, तेही काम अर्धवट असल्याचे समजते आहे.
३. या आदिवासीवाड्यांना मात्र पाण्यासाठी कायमचे झगडावे लागत आहे. त्यामुळे या आदिवासी बांधवांनी ठोस उपाययोजनेची मागणी केली आहे.
आम्ही आदिवासींच्या पाण्याची समस्या दूर करण्यासाठी ३१ एप्रिलपासून टँकरची व्यवस्था सुरू केली आहे. रानसई आदिवासीवाड्यांचा पाण्याचा प्रश्न कायमचा दूर करण्यासाठी जलजीवन मिशनच्या माध्यमातून तीन विहिरींचे प्रस्ताव करून दोन विहिरी बांधल्या आहेत. एक विहिरीचे काम आणि उर्वरित बाकी कामे पैसे न मिळाल्याचे कारण पुढे करत ठेकेदारांनी अर्धवट ठेवले आहेत. ही कामे पूर्ण झाल्यानंतर या आदिवासी बांधवांच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागेल.
-रूपाली म्हात्रे, उपाभियंता, पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद
आम्हाला पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. पाण्यासाठी मजुरी सोडावी लागते. आम्हाला या पाणीप्रश्नातून कायमचे मुक्त करून पाणी द्या.
- मोहन कातकरी, खैरकाठी रहिवासी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.