कोंडीच्या ‘त्या’ ३५ तासांत साडेपाच कोटींची टोलवसुली
मुंबई-पुणे द्रुतगतीवरील धक्कादायक वास्तव
सुजित गायकवाड ः सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १३ : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ३ फेब्रुवारीला झालेल्या गॅस टँकरच्या भीषण अपघातानंतर हजारो प्रवासी आडोशी बोगद्याजवळ अडकून पडले होते; मात्र या भीषण आपत्तीच्या काळातही महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि टोल कंत्राटदार ‘आयआरबी’ यांनी आपली ‘वसुली’ सुरूच ठेवली होती. या ३५ तासांत प्रवाशांकडून तब्बल पाच कोटी १६ लाख आठ हजार ३३६ रुपयांचा टोल वसूल करण्यात आला. माहिती अधिकारातून हे धक्कादायक वास्तव दिसून आले.
महामार्ग जेव्हा पूर्णपणे बंद होता आणि वाहने जागेवरून हलत नव्हती, तेव्हा फास्टॅग खात्यातून पाच कोटींहून अधिक रक्कम कपात करण्यात आली. धक्कादायक म्हणजे, या लूटमार करणाऱ्या टोलवसुलीचा परतावा देण्याचा प्रस्ताव अद्यापही शासन स्तरावर प्रलंबित आहे. ३५ तासांच्या वाहतूक कोंडीनंतर केलेली पाच कोटी १६ लाख रुपयांहून अधिकची टोलवसुली, ही केवळ तांत्रिक आपत्ती नसून ती प्रशासकीय उदासीनता होती. माहिती अधिकार कार्यकर्ते प्रशांत ढसाळ यांनी ही माहिती मिळवली. अंदाजे एक लाख २० हजार वाहनधारकांच्या ‘फास्टॅग’ खात्यातून ही रक्कम कपात करण्यात आली. प्रशासनाने टोलवसुली थांबवण्याचे आदेश दिल्याचे सांगितले असले, तरी प्रत्यक्ष टोलनाक्यांवर ‘बॅरिअर्स’ उशिरा उघडले गेल्याने किंवा फास्टॅग स्कॅनर्स चालू राहिल्याने ही वसुली सुरूच राहिली. आरटीआयमधून हेही स्पष्ट झाले, की कोंडीत अडकलेल्या अनेक प्रवाशांनी टोलवसुलीबाबत ईमेलद्वारे तक्रारी केल्या होत्या; मात्र या तक्रारींवर कोणतीही ठोस कारवाई झाल्याची नोंद प्रशासनाकडे उपलब्ध नाही. विशेष म्हणजे, जबाबदारी निश्चित करण्याऐवजी मुख्य कार्यालयाने प्रकरण पुणे कार्यालयाकडे वर्ग करून आपले हात झटकले आहेत.
द्रुतगती मार्ग या ३५ तासांच्या काळात तो एका खुल्या तुरुंगासारखा भासत होता. त्यात नागरिकांचे हाल झाले. मुंबईला होणारा दूध आणि भाजीपाल्याचा पुरवठाही विस्कळित झाला. शेतकरी आणि व्यापाऱ्यांना आर्थिक फटका बसला.
...
धोरणाचा अभाव
आरटीआयमधील उत्तराने हे स्पष्ट केले आहे, की आपत्कालीन परिस्थितीत टोल थांबवण्यासाठी शासनाकडे आणि एमएसआरडीसीकडे कोणतेही स्पष्ट धोरण नाही.
...
इतर नाक्यांवरही वसुली
अपघातानंतर जेव्हा गाड्या जागच्या हलू शकत नव्हत्या तेव्हा म्हणजे ३ फेब्रुवारीच्या संध्याकाळपासून ते ५ फेब्रुवारीच्या पहाटेपर्यंत विविध टोलनाक्यांवरून तब्बल ५,१६,०८,३३६ इतका टोल वसूल करण्यात आला. हा आकडा केवळ पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाचा नसून त्यात जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील काही टोलनाक्यांचाही समावेश होता. कारण वाहतूक तिकडे वळवण्यात आली होती.
...
३ फेब्रुवारीला काय घडले?
- लोणावळ्याजवळील खालापूर घाटातील आडोशी बोगद्याजवळ प्रोपलीन वायू वाहून नेणारा एक टँकर संध्याकाळी साधारण ४.४५च्या सुमारास उलटल्याने वायूची गळती सुरू झाली.
- स्फोटाचा मोठा धोका निर्माण झाल्याने पोलिसांनी मुंबईकडे जाणारी वाहतूक त्वरित पूर्णपणे बंद केली, तर पुण्याकडे जाणारी वाहतूक अत्यंत संथ गतीने व नियंत्रणात सुरू ठेवली.
- यामुळे काही तासांतच महामार्गावर २० किलोमीटरहून अधिक लांबीच्या रांगा लागल्या, ज्याचा प्रभाव पुढील ५० किलोमीटरपर्यंत जाणवत होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.