इंधन दरवाढीने रोजगारावर गदा
खरीप हंगामाला फटका, शेतकरी हवालदिल
जव्हार, ता. १४ (बातमीदार) ः खरीप हंगामातील शेतीद्वारे येथील नागरिकांना रोजगार उपलब्ध होत असतो. पावसाळ्यातील चार महिने शेतात काबाडकष्ट करून उरलेले आठ महिने कुटुंबाची दिनचर्या होते; मात्र यंदा युद्धाचे सावट असल्याने इंधन दरवाढीच्या संकटाचा खरीप हंगामाला फटका बसला आहे.
खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच शेतकऱ्यांसमोर वाढत्या मशागतीच्या खर्चाचे आव्हान उभे राहिले आहे. खतांच्या भावात वाढ झाल्याने अडचणी असताना आता मशागतीसाठी ट्रॅक्टरसह विविध यंत्रे भाड्याने देण्याचे भावही वाढले आहेत. ट्रॅक्टर भाडे, इंधन दरवाढ, मशागतीचा खर्च, वाढलेली मजुरी तसेच बियाणे, खतांच्या वाढलेल्या किमतीमुळे उत्पादन खर्चात वाढ झालेली आहे. त्यामुळे हंगामापूर्वीच शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
---------------------------
मशागतीसाठी खिसा रिकामा
ट्रॅक्टर मालकांनी भाडे वाढवल्याने शेतजमीन तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना पूर्वीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागत आहेत. विशेषतः लहान, मध्यम शेतकऱ्यांसाठी ही वाढती डोकेदुखी ठरत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ट्रॅक्टर मशागतीसाठी २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
--------------------
बियाणे, खते खरेदीची लगबग
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जव्हार तालुक्यात बी-बियाणे, रासायनिक खते खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. यंदाचा पावसाळा सुरू होण्यास अवघ्या काही दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीसाठी आवश्यक बियाणे, खते आदी वस्तूंची खरेदी सुरू केली आहे.
---------------------
वातावरणातील बदल, वाढत्या महागाईने कर्जबाजारी होऊन खरीप हंगामातील पिके लागवड करीत असतो. दरवर्षी उत्पन्न अधिक मिळेल, अशी आशा असते; पण यंत्रसामग्रीच्या भाडेवाढीने गणित कोलमडले आहे.
- संगीता धूम, शेतकरी, हाडे
-------------------
युद्धामुळे सर्वच जिन्नसांचे भाव वाढले आहेत. राज्य तथा केंद्र शासनाने शेतकऱ्यांकरिता सोयीची धोरणे राबवून काही सवलती देऊन मदत करणे गरजेचे आहे.
- भारती कामडी, शेतकरी, डेंगाचिमेट
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.