१५ जूनपर्यंत हापूसची परदेशवारी
परदेशातही कोकण हापूसची परराज्यांतील हापूसने केली स्पर्धा
वाशी, ता. १४ (बातमीदार)ः जागतिक बाजारपेठेत कोकणच्या हापूस आंब्याला नेहमीच मोठी मागणी असते. मात्र, यंदा कोकण हापूसला आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तमिळनाडू राज्यांतील हापूस आंब्यांकडून मोठी स्पर्धा मिळत आहे. निर्यातीच्या बाजारात आता कोकण विरुद्ध परराज्य असा सामना रंगला असून, ही परदेशवारी १५ जूनपर्यंत सुरू राहण्याची शक्यता निर्यातदारांनी वर्तवली आहे.
यंदा हापूसच्या हवाई निर्यातीसाठी विमान भाड्यात ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी ३५० रुपये किलो असणारे भाडे आता ६०० ते ७०० रुपयांवर पोहोचले आहे. तीन किलोच्या एका बॉक्सला केवळ १,८०० रुपये विमान भाडे मोजावे लागत आहे. यामुळे परदेशात हापूस आंब्याची विक्री महागली असून, १,५०० रुपयांना खरेदी केलेला डझनभर आंबा सर्व खर्च मिळून ४,५०० रुपयांना विकावा लागत आहे. युद्धामुळे सुरुवातीच्या काळात निर्यातीवर परिणाम झाला होता. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून सागरी आणि हवाईमार्गे निर्यात पुन्हा जोमाने सुरू झाली आहे. आखाती देशांसह अमेरिका, युके, जपान, ऑस्ट्रोलिया, दक्षिण कोरिया, युरोप आणि न्युझीलंड या देशात ही हापूसची वारी झाली. दरम्यान, गुजरात आणि उत्तर प्रदेश सरकार आपल्या राज्यांतील निर्यातदारांना विमान भाड्यात २५ टक्के अनुदान देते. त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेही कोकण हापूसच्या निर्यातदारांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी व्यापारी आणि निर्यातदारांनी केली आहे.
भावातील तफावत ठरतेय कळीचा मुद्दा
कोकण हापूस आणि परराज्यांतील हापूसच्या भावात मोठी तफावत असल्याने परदेशी बाजारपेठेत परराज्यांतील आंब्यांची मागणी वाढली आहे.
कोकण हापूस : कच्च्या आंब्याची पाच डझनची पेटी १,५०० ते दोन हजारांना विकली जाते. तर, परराज्यांतील हापूस निर्यातदार ५० ते ६० रुपये किलो भावाने खरेदी करतात. यामुळे स्वस्त भावात उपलब्ध होणाऱ्या परराज्यांतील आंब्याकडे अनेक निर्यातदारांचा कल वाढला आहे, अशी माहिती निर्यातदार प्रकाशभाई यांनी दिली.
देश भाव महिन्याची निर्यात (टनमध्ये) प्रतिकिलो (विमान भाडे)
युएसए ३५ डॉलर (१ बॉक्स ३ किलो) ६०० ७०० रुपये
लंडन, युरोप १५ ते २० पौंड (१ बॉक्स ३ किलो) ५०० ते ६०० ३०० ते ३५० रुपये
ऑस्ट्रेलिया २५ डॉलर (१ बॉक्स ३ किलो) १०० ४५० रुपये किलो
न्यूझीलंड २५ डॉलर (१ बॉक्स ३ किलो) ३०० ४५० रुपये किलो
सिंगापूर २५ डॉलर (१ बॉक्स ३ किलो) ५० ३००० डॉलर कंटनेर (जहाज)
गल्फ २० दिस्हम(१ बॉक्स ३ किलो) ३००० ३००० डॉलर (जहाज)