३६ तासांनंतरही पाणीपुरवठा ठप्प
व्हॉल्व बसविण्याचे काम रखडल्याने नवी मुंबईकरांचे प्रचंड हाल; टँकर आणि बिसलेरीवर नागरिकांची भिस्त
तुर्भे, ता. १४ (बातमीदार) : नवी मुंबई महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने मुख्य जलवाहिनीवर व्हॉल्व बसविण्यासाठी घेतलेला २४ तासांचा शटडाऊन नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरला आहे. नियोजित वेळ उलटून ३६ तास झाले तरी अनेक भागांत पाणीपुरवठा पूर्ववत न झाल्याने शहरवासीय हैराण झाले आहेत. पाण्यासाठी नागरिकांना आता खासगी टँकरचा आधार घ्यावा लागत आहे.
महापालिकेने बुधवार (ता. १३) सकाळी १० ते गुरुवार (ता. १४) सकाळी १० वाजेपर्यंत दुरुस्तीसाठी पाणी बंद ठेवले होते. मात्र, गुरुवारी सकाळी काम पूर्ण झाल्यावर मुख्य जलवाहिनीवर पुन्हा गळती आढळून आली. ही गळती रोखण्यासाठी पुन्हा दुरुस्ती करावी लागल्याने पाणीपुरवठा सुरू करण्यास विलंब झाला. परिणामी, तब्बल ३६ तास पाणीपुरवठा विस्कळित राहिल्याने शहरातील अनेक सोसायट्यांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली. काही भागांत सोसायट्यांच्या टाक्याही पूर्णपणे कोरड्या पडल्याने नागरिकांनी महापालिकेविरोधात नाराजी व्यक्त केली. परिणामी, रहिवाशांना वापराच्या पाण्यासाठी खासगी टँकर मागवावे लागले.
व्हॉल्व टप्प्याटप्प्याने सुरू
देखभाल दुरुस्ती आणि व्हॉल्व बदलण्याचे मुख्य काम दुपारपर्यंत पूर्ण झाले असून, बंद ठेवण्यात आलेले सर्व व्हॉल्व टप्प्याटप्प्याने सुरू केल्यानंतर सायंकाळपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती कार्यकारी अभियंता संतोष उणवणे यांनी दिली. मात्र, नियोजनाच्या अभावामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागल्याची भावना व्यक्त होत असून, भविष्यात अशा कामांसाठी पर्यायी पाणीपुरवठ्याची व्यवस्था आणि अधिक सक्षम नियोजन करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.