सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ ः पश्चिम उपनगरातील गोराई येथे उभारण्यात आलेल्या देशातील पहिल्या वैशिष्ट्यपूर्ण कांदळवन उद्यानाला माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात येणार आहे. तब्बल आठ हेक्टरवर पसरलेल्या या उद्यानाचे काम अंतिम टप्प्यात असून, या महिनाअखेरपर्यंत ते पर्यटकांसाठी खुले होण्याची शक्यता आहे.
बोरिवलीचे आमदार संजय उपाध्याय यांनी या उद्यानाला अटलजींचे नाव देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मांडला होता. या प्रस्तावाला वन विभागाच्या कांदळवन कक्षाने नुकतीच मंजुरी दिली आहे. मुंबई महापालिकेने २०२० मध्ये गोराईतील डम्पिंग ग्राउंडच्या जागी विकसित केलेल्या ‘अटल स्मृती उद्याना’नंतर आता हे कांदळवन उद्यानही वाजपेयींच्या नावाने ओळखले जाईल.
कांदळवन परिसंस्थेचा पर्यटकांना जवळून अनुभव घेता यावा, यासाठी ३३.४३ कोटी रुपये खर्चून हे उद्यान साकारण्यात आले आहे. यामध्ये ७५० मीटर लांबीचा लाकडी ‘वॉक-वे’ तयार करण्यात आला आहे. या मार्गाच्या शेवटी खाडीचे सौंदर्य पाहण्यासाठी एक विशेष डेक उभारण्यात आला आहे.
खाडी क्षेत्राचे विहंगम दृश्य पाहण्याची सोय
पक्षीप्रेमींसाठी येथे १८ मीटर उंचीचा निरीक्षण मनोरा उभारण्यात आला आहे. येथून परिसरातील विविध पक्षी आणि विस्तीर्ण खाडी क्षेत्राचे विहंगम दृश्य पाहता येईल. येथे पर्यटकांच्या सुविधेसाठी सौरऊर्जेचा वापर करण्यात आला असून, रूफटॉप रेस्टॉरंट आणि निसर्ग संकल्पनेवर आधारित भेटवस्तूंचे दुकानही आकर्षण ठरणार आहे.
मेच्या अखेरीस सेवेत दाखल
दोन मजली ‘निसर्ग परिचय केंद्र’ उभारले असून, तिथे ग्रंथालय आणि माहिती फलकांच्या माध्यमातून कांदळवनातील जैवविविधतेचा अभ्यास करता येईल. या उद्यानाचे काम २०२१ मध्ये सुरू झाले होते. तांत्रिक कारणांमुळे उद्घाटनाच्या तारखा अनेकदा पुढे ढकलण्यात आल्या; मात्र आता किरकोळ कामे शिल्लक असून मेच्या अखेरीस हे पर्यटन केंद्र मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल, असे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.