पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल लांबणीवर
मुख्य आरोपी पद्मसिंह पाटील आजारपणामुळे अनुपस्थित
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : पवनराजे निंबाळकरांसह त्यांच्या वाहनचालकाच्या हत्येच्या प्रकरणातील मुख्य आरोपी माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील आणि अन्य एक आरोपी प्रकृतीच्या कारणास्तव गुरुवारी (ता. १४) विशेष सीबीआय न्यायालयात अनुपस्थित राहिले. या प्रकरणाची सुनावणी लांबणीवर पडल्याने निकाल आता १६ जूनला देण्याची शक्यता आहे.
धाराशिवचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर व त्यांचा वाहनचालक समद काझी याची ३ जून २००६ रोजी नवी मुंबईतील कळंबोली येथे गोळ्या झाडून हत्या झाली होती. राजकीय कारकिर्दीला धोका निर्माण झाल्याने पाटील व इतरांनी कट रचून निंबाळकर यांची हत्या केल्याचा सीबीआयचा आरोप आहे. घटनेनंतर तीन वर्षांनी पाटील यांना अटक केली होती. याप्रकरणी डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह नऊ जणांवर खटला चालला होता. २० वर्षांनंतर आज विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस. आर. नावंदर खटल्याचा निकाल देण्याची शक्यता होती; मात्र पाटील यांच्यासह आरोपी मोहन शुक्ला हे दोघेही प्रकृती अस्वास्थ्यामुळे सुनावणीला अनुपस्थित राहिल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले. त्याची दखल घेऊन न्यायालयाने प्रकरणाची सुनावणी १६ जून रोजी ठेवली. तसेच, पुढील सुनावणीला सर्व आरोपींनी उपस्थित राहण्याचे आदेश दिले.
----
१४ वर्षांपासून सुनावणी
पवनराजे निंबाळकरांच्या हत्याप्रकरणात पारसमल जैन बादला हा माफीचा साक्षीदार असून त्याचा जबाब निकालात महत्त्वाचा ठरणार आहे. पद्मसिंह पाटील मुख्य आरोपी असल्याने या प्रकरणाचा तपास सुरुवातीला स्थानिक पोलिस, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) आणि नंतर सीबीआयकडून करण्यात आला होता. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह सुमारे १२८ साक्षीदार तपासण्यात आले. ४ जुलै २०११ रोजी विशेष न्यायालयात या खटल्याच्या सुनावणीला सुरुवात झाली. सुनावणीवेळी पाटील यांच्या वतीने सुमारे १,२५० पानांचे लेखी म्हणणे मांडले. त्यात निंबाळकर कुटुंबीयांवरच गंभीर आरोप केले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.