वसईत खंडणीसाठी प्रियकराचा खून
मृतदेह ड्रममध्ये भरून गटारात फेकला
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १४ : मुंब्रा येथील बेपत्ता तरुणाच्या प्रकरणात प्रेयसीनेच पती, भाऊ आणि मित्राच्या मदतीने प्रियकराचा खून केल्याचे समोर आले आहे. खंडणीसाठी आखलेल्या कटातून तरुणाची हत्या करून त्याचा मृतदेह ड्रममध्ये भरून वसईतील गटारात फेकण्यात आल्याची संतापजनक घटना गुरुवारी (ता. १४) उघडकीस आली आहे. याप्रकरणी प्रेयसी मेहजबीन खातून इकरान शेख आणि तिचा भाऊ तारीक इकरान शेख यांना अटक केली. पती हसन आणि मित्र मुज्जम पठाण हे अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त प्रिया डमाळे यांनी दिली.
मुंब्रा परिसरातील अरबाज मकसूद अली खान हा ३ एप्रिल रोजी दादरला पैसे घेण्यासाठी जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडला होता; मात्र तो घरी परतला नाही. त्यानंतर त्याचे वडील मकसूद अली खान यांनी मुंब्रा पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. त्यानुसार, तपासादरम्यान पोलिस उपनिरीक्षक अंबादास सावंत यांनी अरबाजच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स आणि लोकेशन तपासले. त्या वेळी त्याचा मोबाईल वसईतील भोईदापाडा परिसरात असल्याचे समोर आले. त्याच वेळी अरबाजची प्रेयसी मेहजबीन खातून हिच्या मोबाईलचे लोकेशनही त्याच परिसरात असल्याचे आढळले.
पोलिसांनी मेहजबीनला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर तिने गुन्ह्याची कबुली दिली. मेहजबीनने तिचा पती हसन, भाऊ तारीक शेख आणि मित्र मुज्जम तालीब पठाण यांच्या मदतीने अरबाजला वसई येथे बोलावले. तेथे त्याच्याकडे पैशांची मागणी करण्यात आली. पैसे देण्यास नकार दिल्यावर त्यांनी त्याचे हातपाय बांधले आणि प्लास्टिकच्या पाइपने मारहाण करीत हत्या केली. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांनी अरबाजचा मृतदेह हिरव्या रंगाच्या ड्रममध्ये भरून वालीव परिसरातील निर्जन नाल्यात फेकून दिला. याप्रकरणी मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी मेहजबीन आणि तिचा भाऊ तारीक यांना अटक केली आहे. तर, मेहजबीनचा पती हसन आणि मित्र मुज्जम पठाण यांचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.