एमआयडीसी करणार औद्योगिक वसाहतीचा विस्तार
अतिरिक्त टीटीसी औद्योगिक क्षेत्रासाठी भूसंपादन प्रक्रिया वेगात
मौजे बोरिवली व आडवली-भुतावली परिसरातील जमिनींच्या संभाव्य दर निश्चितीची प्रक्रिया सुरू
तुर्भे, ता. १५ (बातमीदार) : १९६५ मध्ये स्थापन झालेल्या नवी मुंबईतील टीटीसी (ठाणे-बेलापूर) औद्योगिक वसाहतीचा आता विस्तार होणार आहे. राज्याच्या उद्योग विभागाने एमआयडीसीच्या माध्यमातून अतिरिक्त टीटीसी औद्योगिक क्षेत्र विकसित करण्याची तयारी पूर्ण केली असून, त्यासाठी मौजे बोरिवली व आडवली-भुतावली परिसरातील भूसंपादन प्रक्रियेला वेग आला आहे. या विस्तारामुळे परिसरात उद्योग, लॉजिस्टिक पार्क्स आणि रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत.
अतिरिक्त टीटीसी औद्योगिक क्षेत्र विस्तारासाठी ठाणे जिल्ह्यातील मौजे बोरिवली आणि आडवली-भुतावली परिसरातील खासगी जमिनींच्या भूसंपादन प्रक्रियेला वेग आला असून, संबंधित खातेदारांना देण्यात येणाऱ्या नुकसानभरपाईच्या संभाव्य दर निश्चित करण्यासाठी शासन स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने मौजे-बोरिवली येथील सुमारे १९.९९४ हेक्टर खासगी जमीन संपादित करण्याचा प्रस्ताव ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. यासंदर्भात १५ एप्रिल रोजी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर १७ एप्रिल रोजी भूसंपादनाचा विहित नमुन्यातील प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला. शासनाने संबंधित अधिकाऱ्यांना या भूसंपादन प्रक्रियेसाठी प्राधिकृत केले असून, भूमी अधिग्रहण कायदा २०१३ अंतर्गत जमीनमालकांना देण्यात येणाऱ्या नुकसानभरपाईचा संभाव्य दर निश्चित करण्याची मागणी करण्यात आली आहे. संभाव्य दर निश्चित झाल्यानंतर पुढील प्रशासकीय आणि आर्थिक कार्यवाही करण्यास एमआयडीसीला मार्ग मोकळा होणार आहे. औद्योगिक क्षेत्र घोषित महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ अंतर्गत शासनाने स्वतंत्र आदेश काढून मौजे आडवली-भुतावली आणि मौजे बोरिवली येथील क्षेत्र औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे.
शासन आदेशानुसार
मौजे आडवली-भुतावली येथील क्षेत्रासाठी प्रकरण ६ लागू होण्याची तारीख १० एप्रिल व मौजे बोरीवली येथील क्षेत्रासाठी ही तारीख ९ एप्रिल २०२६ निश्चित करण्यात आली आहे.
या दोन्ही क्षेत्रांचा समावेश अतिरिक्त टी.टी.सी. औद्योगिक विकास आराखड्यात करण्यात आला असून, संबंधित क्षेत्रांचे नकाशे मुख्य कार्यकारी अधिकारी, एमआयडीसी, अंधेरी पूर्व, मुंबई तसेच उपविभागीय अधिकारी, ठाणे यांच्या कार्यालयात उपलब्ध ठेवण्यात आले आहेत. नकाशांमध्ये संपादित करण्यात येणाऱ्या क्षेत्राची चतुःसीमा लाल रंगाने दर्शविण्यात आली आहे.
शेतकरी आणि जमीनमालकांचे लक्ष संभाव्य दरांकडे
भूसंपादन प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नुकसानभरपाईचा दर. भूमी अधिग्रहण कायदा २०१३ नुसार बाजारभाव, पुनर्वसन, शेतीवरील परिणाम आणि इतर घटकांचा विचार करून दर निश्चित केला जाणार असल्याने संबंधित जमीनमालक आणि शेतकरीवर्गाचे लक्ष आता शासनाच्या पुढील निर्णयाकडे लागले असून, या जमीन संपादनाला शेतकरी विरोध करतील की संमती देतील, याचे चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे.
रोजगारनिर्मिती
औद्योगिक विकासाच्या दृष्टीने अतिरिक्त टीटीसी क्षेत्र महत्त्वाचे मानले जात असून, भविष्यात येथे मोठ्या प्रमाणात उद्योग, लॉजिस्टिक पार्क, गोदामे आणि रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.