सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १५ : नवी मुंबई महापालिका हद्दीतील १४ गावांमध्ये वाढत्या प्रदूषणाच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. दहिसर ठाकूर पाडा परिसरातील वन विभागाच्या डोंगराळ भागात सुरू असलेल्या भंगार गोदामामधून कथितरीत्या रासायनिक कचरा जाळला जात असल्याने पर्यावरण आणि ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. याप्रकरणी मनसेने प्रशासनावर जोरदार टीका करत तत्काळ कठोर कारवाईची मागणी केली आहे.
मनसेचे विभाग अध्यक्ष शरद पाटील यांनी ठाणे जिल्हाधिकारी, कोकण विभागीय आयुक्त, ठाणे तहसीलदार तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे निवेदन सादर करून संबंधित भंगार गोदामचालकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मनसेच्या निवेदनानुसार, अनेक वर्षांपासून वन विभागाच्या डोंगराळ परिसरात काही भंगार गोदामचालकांकडून मोठ्या प्रमाणात रासायनिक पदार्थ बेकायदा जाळले जात आहेत. या प्रक्रियेतून निर्माण होणारा विषारी धूर, दुर्गंधी आणि रासायनिक सांडपाणी यामुळे परिसरातील हवा, पाणी आणि जमीन प्रदूषित होत असल्याचा दावा केला आहे. परिसरातील बोअरवेलमधून रसायनयुक्त दूषित पाणी येत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. तसेच अनेक नैसर्गिक जलस्रोतही प्रदूषित झाल्याने शेतीचे नुकसान होत असून नागरिकांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत असल्याचे सांगण्यात आले. श्वसनाचे विकार, दुर्गंधी आणि विविध आजारांमुळे ग्रामस्थ त्रस्त असल्याचा दावा करण्यात आला आहे. ग्रामस्थांनी यापूर्वी अनेकदा तक्रारी करूनही प्रशासनाने ठोस कारवाई केली नाही. त्यामुळे संबंधित गोदाम तत्काळ सील करावेत, दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, दूषित पाण्याची तपासणी करावी आणि परिसरातील नागरिकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी मनसेने केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.