सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १४ : नीट परीक्षेच्या पेपरफुटीचे कारण पुढे करीत देशभरात फेरपरीक्षा घेण्याचे जाहीर करण्यात आले आहे. ही पेपरफुटी महाराष्ट्रातून झाल्याने हे राज्य सरकारचे अपयश आहे. गेल्या वर्षभरात पेपरफुटीची पाच प्रकरणे झाली आहेत; त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आत्मचिंतन करावे, खरोखर राज्यात कायदा अन् सुव्यवस्था आहे का, हे जाहीर करावे, असे आवाहन राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केले.
देशातील २२ लाख विद्यार्थ्यांनी ३ मे रोजी नीटची परीक्षा दिली. त्यात महाराष्ट्रातील जवळपास अडीच लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. ठाणे जिल्ह्यातील १२ हजार ८६२ विद्यार्थ्यांचा त्यामध्ये समावेश होता. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, तपास यंत्रणांकडून मिळालेल्या गोपनीय अहवालांच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. ३ मे रोजी झालेल्या परीक्षेच्या प्रक्रियेत पारदर्शकता उरली नसल्याचे आणि परीक्षेची गोपनीयता भंग झाल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. परीक्षेची विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी ही परीक्षा रद्द करणे आवश्यक असल्याचे ‘एनटीए’ने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे. एनटीएच्या या निर्णयाचा मनोज प्रधान यांनी चांगलाच समाचार घेतला.
नीट परीक्षा रद्द झाल्यामुळे २२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची मेहनत आणि स्वप्ने धुळीस मिळाल्याचे म्हटले आहे. आईने दागिने विकले, बापाने कर्ज काढले अशा परिस्थितीत मुलांनी अभ्यास केला होता. हा केवळ पेपरफुटीचा विषय नसून तरुणांच्या भविष्याविरुद्ध केलेला गुन्हा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आत्मचिंतन करावे अन् ठाणे जिल्ह्यातील १२ हजार ८६२ विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय रद्द करावा, अशी मागणी प्रधान यांनी केली.
यापूर्वीही अशा घटना
मनोज प्रधान म्हणाले की, मार्चमध्ये पुणे पोलिसांनी एका १८ वर्षीय तरुणाला अटक केली. हा टेलिग्राम ग्रुप तयार करून विद्यार्थ्यांना एसएससी बोर्डाचा पेपर परीक्षेपूर्वी देण्याचे प्रलोभन दाखवून ६०० रुपये उकळत होता. एप्रिल २०२६ मध्ये पेपर फुटल्याचे उघडकीस आल्यानंतर मुंबई विद्यापीठाने बीकेसी पोलिस ठाण्यात अधिकृत गुन्हा दाखल केला होता. नोव्हेंबर २०२५ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगुड पोलिसांनी एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला. मुख्य आरोपी महेश गायकवाडसह जवळपास १८ जणांना टीईटी पेपरफुटीप्रकरणी अटक केली होती. जून २०२५ मध्ये वाघोली इंजिनिअर काॅलेजमध्ये पेपर फोडता न आल्याने पुन्हा परीक्षेला बसवून जुनेच पेपर पुन्हा लिहून घेतल्याप्रमाणे एका प्राध्यापकाला अटक करण्यात आली होती. ही चार प्रकरणे ताजी असतानाच आता नीटची पेपरफुटी उघडकीस आली आहे. हे राज्य सरकारचे अपयश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.